नवी दिल्ली - सहारा'श्री' सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने पु्न्हा एकदा 'जोर का झटका' दिला आहे. कोर्टाने रॉय यांचा प्रस्ताव फेटाळला असून त्यांना तुरुंगातच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सहारा इंडियाच्या वतीने तीन दिवसांमध्ये 2500 कोटी रुपये परत करण्याचा आणि उर्वरित रक्कम 15 महिन्यात देण्याचा प्रस्ताव कोर्टात मांडण्यात आला होता. मात्र, कोर्टाने ही ठोस उपाययोजना नसल्याचे सांगत सहाराच्या वतीने मांडण्या्त आलेला प्रस्ताव फेटाळला. तर, सुब्रतो रॉय यांचे चिरंजीव सीमांतो रॉय यांनी नवीन प्रस्ताव लवकरच कोर्टासमोर सादर करु असे सांगितले आहे.
वकीलांनी काय युक्तीवाद केला
सहाराच्या वतीने वकीलांनी कोर्टासमोर युक्तीवाद केला, की सहारा इंडिया तीन दिवसांमध्ये 2500 कोटी रुपये परत करेल. त्यासोबतच कोर्टाला, पैशांची तजवीज करण्यासाठी सुब्रतो रॉय यांना बाहेर सोडण्याची विनंती केली. मात्र, सुप्रीम कोर्टाने वकिलांचा युक्तीवाद फेटाळला.
त्याआधी वकिलांनी युक्तीवाद केला होता, की सहारा निर्धारित वेळेत टप्प्या टप्प्याने पूर्ण परतफेड करेल. या प्रस्तावाचा सुप्रीम कोर्टाने सेबीला अभ्यास करण्यास सांगितले होते. मात्र, आज सुप्रीम कोर्टाने सहाराच्या वतीने सादर करण्यात आलेले सर्व प्रस्ताव फेटाळून लावले.
हा देखील प्रस्ताव मांडला गेला
सहाराने बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्तांचा सेबी लिलाव करु शकते, हा देखील प्रस्ताव वकिलांनी मांडला होता.
आधी दिला होता हा प्रस्ताव
मंगळवारी सहाराच्या वकीलांनी तीन ते सहा महिन्यांत 22,500 कोटी रुपये बँक गॅरंटी देण्याचा प्रस्ताव दिला होता. कोर्टाने हा प्रस्ताव फेटाळत, ठोस प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते.