आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Sena MPs ‘Force’ Fasting Muslim Staffer To Eat Chapati

VIDEO: सांप्रदायिकतेच्या विळख्यात शिवसेनेचे आंदोलन, लोकसभेत अभुतपूर्व गदारोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: महाराष्‍ट्र सदनमध्ये मुस्लिम खानसाम्याच्या तोंडात चपाती कोंबताना शिवसेनेचे खासदार राजन विचारे (साभार मी मराठी स्क्रीनशॉट)
नवीन महाराष्ट्र सदनात चांगले जेवण मिळावे म्हणून शिवसेनेच्या खासदारांनी आठवड्यापुर्वी केलेल्या आंदोलनाला विरोधकांनी आज लोकसभेत धार्मिक वळण देण्याचा प्रकार केला. सभागृहात कॉँग्रेसने केलेले राजकारण किती खालच्या स्तरावरचे होते याची आज सुज्ञ नागरीकांमध्ये चर्चा आहे. मात्र, या घटनेला धर्माशी जोडल्याने शिवसेनेच्या खासदारांनीही क्षमा याचना करून मोठेपणा दाखविला आहे.
निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबत आणि महाराष्ट्र वगळता अन्य राज्यातील लोकप्रतिनिधींचे अनावश्यक लाड पुरविल्या जात असल्याबाबत शिवसेनेच्या खासदारांनी 17 जुलै रोजी नवीन महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त बिपीन मलिक यांचे लक्ष वेधले होते. याच दिवशी खासदारांनी कॅन्टिनच्या स्वयंपाक खोलीतील अन्नाची तपासणी केली. किळस येईल इतके निकृष्ट दर्जाचे अन्न पाहून उपस्थितांना वैताग येणे स्वाभाविक होते. यावेळी उपस्थित असलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना ते अन्न दाखविण्यात आले. 17 जुलै रोजी दुपारी 1 च्या सुुमारास शिवसेनेच्या 11 खासदारांनी यासंदर्भात उपस्थित कर्मचारी व पर्यवेक्षकाकडे राग व्यक्त केला. आयआरसीटीच्या माध्यमातून हे कॅन्टीन चालविण्यात येते. परंतु ज्याच्यावर या कॅन्टिनची जबाबदारी सोपविली तो कंत्राटदार कधीच येथे फिरकत नसतो. खासदार कृपाल तुमाने यांनी तेथील पोळी उचलली व तुकडे करायला किती त्रास होतो ते दाखवित असताना खा. राजन विचारे यांनी पोळीचा तुकडा उपस्थित असलेल्या पर्यवेक्षकाला खावून दाखव असे म्हणून त्याच्या तोंडाकडे नेला परंतु माझा उपवास आहे असे त्यांने सांगितल्याने काही खासदारांनी खा. विचारे यांना थांबविले. याचवेळी या खासदारांनी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना आयआरसीटीचे कंत्राट रद्द करून उत्तम भोजनाची व्यवस्था करा अशा सूचना दिल्यात. याशिवाय माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग हे उत्तरप्रदेशमधून भाजपचे खासदार असताना त्यांना नवीन महाराष्ट्र सदनात निवासासाठी मंत्र्यांचा कक्ष का उपलब्ध करून देण्यात आला? आणि महाराष्ट्रातील खासदारांना सर्वसाधारण कक्ष का दिले? असा प्रश्नही करण्यात आला परंतु याचे उत्तर मलिक देऊ शकले नव्हते. सत्यपाल सिंग यांच्या सदनातील निवासामुळे उत्तरप्रदेशातील लोकांचा मोठ्या प्रमाणात नवीन महाराष्ट्र सदनात लोंढा आहे आणि त्याचा त्रास मराठी व्यक्तींना सहन करावा लागतो याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.
शिवसेनेच्या खासदारांनी धमकावल्यामुळे मलिक अस्वस्थ झाले. गेल्या तीन वर्षात त्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सातत्याने बळ मिळत असल्यामुळे मलिक हे भाजप व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना चांगली वागणून देत नसल्याची ख्याती आहे. यासंदर्भात भाजप - सेनेच्या लोकप्रतिनिधींनी माध्यमांकडे भावनाही व्यक्त केल्या होत्या.
17 जुलै रोजी शिवसेनेच्या आंदोलनामुळे सदनातील कॅन्टीन बंद करण्यात आली. तर सोमवारी ती नव्या कंत्राटदाराकडून सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन मलिकांनी दिले होते. परंतु मनात राग धरून बसलेल्या मलिकांनी कॅन्टिन सुरु केली नाही. आज मात्र, एका वृत्तपत्राने याला धार्मिकतेचा साज चढविला. खा. विचारे यांनी ज्या पर्यवेक्षकाच्या तोंडात पोळी कोंबली तो मुसलमान असून त्याचा त्या दिवशी रोजा होता असा उल्लेख करण्यात आला आहे. या वृत्तामागे कॉँग्रेसचे नेते असल्याची टिका शिवसेना करीत आहे. आज लोकसभेत कॉँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे यांनी लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिली होती व यावर चर्चा करण्याची मागणी केली. शून्य प्रहरात केरळच्या वयनाड्डा येथील कॉँग्रेसचे खासदार एम. आय. शानवास यांनी शिवसेनेने महाराष्ट्र सदनात गोंधळ घालून रोजा असलेल्या व्यक्तीला जबरदस्तीने पोळी कोंबली असा आरोप केला. यामुळे शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनाही धक्का बसला. हे सर्व सदस्य उभे राहिले आणि त्यांनीही यामागे राजकारण असल्याचे सांगत गोंधळ घालायला सुरुवात केली. शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कॉँग्रेस करीत असलेला आरोप हा ‘झुट है’ असे विधान केले. परंतु हा शब्द असांसदिय असल्याने तो कामकाजातून काढण्यात आला त्यावेळी त्यांनी कॉँग्रेसचे लोक जी माहिती सभागृहापुढे ठेवत आहेत ती असत्य असल्याचे सांगितले. खरगे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. भाजपचे खासदार रमेश बिदुडी आणि एमआयएमचे खासदार ओवेसी यावेळी अध्यक्षांच्या आसनाजवळ आलेत यामुळे पुन्हा गोंधळात भर पडली. परंतु याचवेळी सावध पावित्रा घेत सांसदिय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू, बिदुडी यांनी माफी मागितली. तर शिवसेनेच्या खासदारांनीही आम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. यावेळी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 15 मिनिटांसाठी कामकाज तहकुब करावे लागले.
असे आहे सत्य!
महाराष्ट्र सदनातील ज्या पर्यवेक्षकाच्या तोंडाजवळ पोळीचा तुकडा नेण्यात आला त्याचे नाव अर्षद जुबेर असे आहे. सामान्य व्यक्तीसारखा असल्याने तो हिंदु, मुसलमान किंवा अन्य कोणत्या धर्माचा आहे हे कोणाच्याही डोक्यात येणे शक्यच नव्हते.
जेव्हा त्याने मला उपवास आहे असे सांगितले तेव्हा इतर खासदारांनी विचारे यांना याला जाऊ द्या या कॅन्टिीच्या मालकाला बदडायला पाहिजे असे वक्तव्य केले. सातत्याने एखाद्या गोष्टीची तक्रार असली आणि त्यात सुधारणा होत नसेल तर सर्वसामान्य व्यक्तीही अशाप्रकारे राग व्यक्त करतो त्यातीलच तो प्रकार होता. मात्र, गेले कित्येक दिवस जेवण चांगले मिळत नसल्याची तक्रार सामान्य नागरीक आणि लोकप्रतिनिधींची होती त्याकडे निवासी आयुक्त मलिक यांनी दुर्लक्ष केले होते अशा भावना शिवसेनेचे खासदार व्यक्त करीत होते.
सदनामधील व्यवस्था अत्यंत हीन असल्याचे मत कॉँग्रेसच्या नेत्यांचेही आहे. त्यांनीही अनेकदा राग व्यक्त केला आहे. परंतु त्याला सुधारण्याचे शस्त्र शिवसेनेने हाती घेतल्यानंतर कॉँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला धार्मिक रंग देऊन शिवसेनेबाबत मने कलुषित करण्याचा प्रकार केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केला.
अनेक खासदारांनी सत्यपाल सिंग यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतरही निवासी आयुक्ताने दखल न घेणे हा रागही शिवसेनेला होताच. आयुक्त मलिक यांची तातडिने बदली करण्याची मागणी शिवसेनेने आज केली आहे. इकडे मलिक यांनी मला शिवसेनेपासून धोका असल्याने सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्टÑ सदनाचे व्यवस्थापक ममदापूरकर यांची आयुक्तांनी तातडिने बदली केली असली तरी त्याचे कारण कळू शकले नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मतांचे राजकारण करण्यासाठी हा कुटिल डाव कॉँग्रसने रचल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केला.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण आणि पाहा व्हिडीओ...