नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीआधी काँग्रेसला तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीआधी काँग्रेस प्रणीत यूपीए आघाडीत येण्यास टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी नकार दिला आहे. काँग्रेस आणि टीआरएस यांच्यातील आघाडीत बिघाडी होत असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. आज (शनिवार) पक्षप्रमुख राव यांनीच तेलंगणामध्ये टीआरएस काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनीही तेलंगणात काँग्रेस सर्व जागा स्वबळावर लढवेल असे जाहीर केले आहे.
भाजपसोबत आघाडीची शक्यता
टीआरएसने काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास नकार दिल्यानंतर आता त्यांचा मोर्चा भाजपकडे वळण्याची दाट शक्यता आहे. टीआरएसच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत निवडणूकपूर्व युती करण्याचे संकेत दिले आहेत. वेगळ्या तेलंगणाला लोकसभेत भाजपने समर्थन दिले होते. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे, की भाजपसोबत अनौपचारिक चर्चा सुरु होती. कारण टीआरएसने काँग्रेसमध्ये विलीन होण्यास स्पष्ट नकार दिला होता.
सुत्रांच्या माहितीनुसार टीआरएस आणि भाजप यांच्यातील चर्चा जागा वाटपापर्यंत पोहोचली आहे. केंद्रात एनडीए टीआरएसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करु शकत नसल्याचाही त्यांनी दावा केला.