नवी दिल्ली- दिल्लीहून आग्रा येथे आता अवघ्या 90 मिनिटांत पोहोचता येणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वेची ट्रायल गुरुवारी (3जुलै) घेतली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ताशी 160 किलोमीटर धावणारी हायस्पीड रेल्वे नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नवी दिल्लीहून आग्रा येथे रेल्वेने जाण्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो.
सकाळी दहा वाजता नवी दिल्लीहून रवाना होणार...
5400HPच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने अद्ययावत असलेली रेल्वेची ट्रायल गुरुवारी सकाळी 10 वाजता नवी दिल्ली स्टेशनवर केली जाईल. संरक्षण आयुक्त पी.के. वाजपेयी, दिल्ली तसेच आर्ग्याचे डीआरएमसह वरीष्ठ अधिकारीदेखील या रेल्वेत उपस्थित राहतील.
'हायस्पीड रेल्वेला दहा डबे असतील. नवी दिल्लीहून ती आग्रासाठी रवाना होणार असून त्याच दिवशी परतीचा प्रवास करेल, अशी माहिती दिल्लीचे डीआरएम अनुराग सचान यांनी दिली.
ट्रायल घेताना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रुळाच्या दोन्ही बाजूने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. नवी दिल्ली ते आग्रा मार्गावर 16 गतिरोधक आणि काही वळणे आहेत. रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रुळावरही काम करण्यात आले आहे. ट्रायल दरम्यान कोणताही रुळावर कोणत्याप्रकरचा अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी 27 किलोमीटर लांब कठडे बांधण्यात आले आहेत. प्रोजेक्टशी संबंधित एका अधिकार्याने सांगितले की, हायस्पीड रेल्वेसाठी रुळ तयार करण्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ताशी 150 किलोमीटर वेगाने धावते.
कानपूर आणि चंडीगडदरम्यान धावेल हायस्पीड रेल्वे...
नवी दिल्ली- आग्रादरम्यान सुरु होणारी हायस्पीड रेल्वे यशस्वी झाल्यानंतर दिल्लीहून कानपूर आणि चंडीगडसाठी अशाप्रकारची हायस्पीड रेल्वे सुरु केली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
(फाइल फोटोः रेल्वे एक्स्प्रेस)