नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आर. एम. लोढा शनिवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी न्यायमूर्ती लक्ष्मीनारायणन स्वामी दत्तू हे रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे ४२ वे सरन्यायाधीश म्हणून पदाची सूत्रे स्वीकारतील. २००८ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायामूर्ती बनले होते.
दत्तू यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली असती तर आज ते वकील नव्हे, तर डॉक्टर किंवा इंजिनिअर राहिले असते. चिकमंगळूर (कर्नाटक)च्या इडिगा समुदायात ३ डिसेंबर १९५० रोजी जन्मलेले दत्तू यांनी १९७५ पासून बंगळुरूमध्ये वकिली व्यवसायास प्रारंभ केला. डिसेंबर १९९५ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून, तर फेब्रुवारी २००७ मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी मे महिन्यात त्यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाचा कार्यभार सांभाळला. डिसेंबर २००८ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. दत्तू यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरात मुळातच शैक्षणिक वातावरण होते.
गरीबीतून वाटचाल
दत्तू यांना बहीणही होती. मुलगी डॉक्टर व्हावी, अशी वडिलांची इच्छा होती. दत्तूनेसुद्धा डॉक्टर किंवा इंजिनिअर बनावे, असेही वडिलांना वाटायचे. परंतु दोघांच्याही अशा शिक्षणासाठी कुटुंबीयांची आर्थिक ऐपत नव्हती. त्यामुळे दत्तू यांनी बहिणीलाच एमबीबीएसचे शिक्षण घेऊ द्यावे, अशी विनंती वडिलांकडे केली. त्यानंतर दत्तू यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि निष्णात वकील बनले.
कुटुंबातील पहिलेच
वकिली व्यवसायात आलेले ते त्यांच्या कुटुंबातील पहिलेच व्यक्ती. कर्नाटकमध्ये त्यांची अराजकीय वकील म्हणून ख्याती होती. बंगळुरूमध्ये असताना त्यांनी नागरी, गुन्हेगारी, संवैधानिक आणि करसंबंधित खटले लढवले. गरिबांसाठी धावून येणारे दत्तू कित्येक खटल्यांसाठी शुल्कही घ्यायचे नाही, असे बंगळुरूतील लोक आजही सांगतात. न्यायमूर्तींच मित्रपरिवार जास्त मोठा नाही. त्यांना एकटेच राहायला आवडते. बहुतांश वेळा शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून त्यांना घेऊन घरी जाणारी कार थेट सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निघते.