आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात "फोर जी'ची किमान "स्पीड' ठरलेलीच नाही : ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आधार कार्ड प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आर. एस. शर्मा ट्रायचे चेअरमन होण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे सचिव होते. या अनुषंगाने ग्राहकांना टेलिकॉम कंपन्यांच्या सेवेमुळे होणारा त्रास, नेट न्यूट्रिलिटी आणि किरणोत्सर्गासह अनेक मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. भारतात किरणोत्सर्गाने कोणतेही नुकसान होत नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील मुख्य अंश पुढीलप्रमाणे-
- फोरजीसाठी ट्राय कोणती किमान स्पीड लिमिट निश्चित करत आहे काय? थ्रीजीमध्येच कंपन्या स्पीड देत नाहीत.
सरकारने स्पेक्ट्रमचे परवाने किंवा सेवा देणाऱ्या कंपन्यांना परवाने देताना ते कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करणार, अशी अट नाही. हे लिब्रजाइज्ड स्पेक्ट्रम आहे. यामध्ये कोणतेही तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. फोर जी तंत्रज्ञान आणले जात आहे. त्याचा वेग जास्त असेल हे उघड आहे. डेटाची किंमत कमी असेल. कंपन्या ही सेवा आणत आहेत, ही चांगली बाब आहे. मिनिमम प्रिस्क्राइब्ड स्पीड आम्ही बनवली आहे. कंपन्या स्पीड जास्त देणार असतील तर दूरसंचार कंपनीचाही फायदा होईल. आम्हाला सक्ती करण्याची आवश्यकता नाही.
- नेट न्यूट्रिलिटीसाठी ट्राय काय करत आहे? सध्या काय सुरू आहे?
ट्रायचा पेपर ओव्हर द टॉप (ओटीटी) होता. दस्तऐवज प्रसिद्ध झाल्यानंतर लाेकांनी मोठ्या संख्येने सूचना केल्या होत्या. ओटीटीला नियंत्रित करण्याचा मुद्दा कुठे ना कुठे नेट न्यूट्रिलिटीशी संबंधित आहे. ही नेट न्यूट्रिलिटी त्याचा मोठा भाग आहे. सरकारनेही नेट न्यूट्रिलिटीवर कन्सल्टेशन पेपर प्रसिद्ध केला होता. त्यावर प्रतिक्रिया आली असून सरकार चर्चेअंती येत्या काही महिन्यांत निर्णय घेईल.

- महापालिका कधी मोबाइल टॉवर स्थापन करण्यास परवानगी देते, तर कधी नाही. कधी एखाद्या घरावर टॉवर बसवले जाते आणि पुन्हा ते काढावे लागते. यामुळेही नेटवर्कसंबंधी समस्या निर्माण होतात का?
टॉवर बसवण्यात समस्या येत आहेत. त्यामुळे दूरसंचार मंत्र्यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे की, सरकारी इमारती व परिसरात टॉवर लावण्यासाठी परवानगी दिली जावी. टॉवर लावल्यानंतर कॅन्सर होतो, असा लोकांमधील समज चुकीचा आहे. भारतात टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग खूप कमी आहे. पाश्चिमात्य देशांत मंजूर केलेल्या किरणोत्सर्ग स्तराचा दहाव्या भागाएवढे किरकोळ उत्सर्जन होते. यामुळे लोकांना चिंता वाटत असेल तर ती खेदजनक बाब आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांनी टॉवर काढून टाकले आहेत. टॉवर नसतील तर कनेक्टिव्हिटी कशी मिळेल? किरणोत्सर्ग नुकसानकारक नाही. त्यामागे कोणताही तर्क नाही. ट्राय, सरकार आणि कंपन्यांनी एकत्र येऊन काम केल्यास हा गैरसमज दूर होईल. किरणोत्सर्गामुळे नुकसान होत नाही.
- कंपन्यांच्या स्पेक्ट्रम शेअरिंग शेअरिंगबाबत ट्रायचे काय मत आहे? अनेक कंपन्यांनी जेवढे स्पेक्ट्रम घेतले आहेत, तेवढा त्यांचा वापर होत नाही?
आतापर्यंत स्पेक्ट्रम शेअरिंगला सरकारने मंजुरी दिली होती. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पेक्ट्रम ट्रेडिंगलाही सरकारने मंजुरी दिली आहे. स्पेक्ट्रम शेअरिंग आणि ट्रेडिंगनंतर स्पेक्ट्रम एकत्र होतील. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देता येईल. ही एक चांगली बाब आहे.
- ट्रायने ग्राहकांच्या समाधानाबाबत केलेल्या सर्वेक्षणात कशा प्रतिक्रिया मिळाल्या? भविष्यातील योजना काय आहेत?
काही सर्वेक्षणे झाली, आणखी होत राहतील. आम्ही सर्वेक्षणांतील निष्कर्षही लोकांपुढे मांडू. आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्याऐवजी थेट लोकांना दूरध्वनी करून माहिती घेऊ. कॉल सेंटरद्वारे ग्राहकांकडून सेवेबाबत मत आजमावले जाईल. यामुळे कमी अवधीत जास्त लोकांशी संपर्क साधला जाईल आणि खर्चही कमी येईल.