आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टातील पहिल्या महिला न्यायमूर्ती लीला सेठ यांचे निधन, निर्भया प्रकरणी समितीच्या सदस्यही होत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हायकोर्टात न्यायमूर्ती झालेल्या देशातील पहिल्या महिला लीला सेठ (८६) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव संशोधनासाठी दान करण्यात आले. लीला यांचा जन्म २० ऑक्टोबर १९३० रोजी लखनऊत झाला. अपत्यप्राप्तीनंतर आईची जबाबदारी सांभाळत १९५८ मध्ये त्यांनी लंडनमध्ये कायद्याची पदवी घेतली आणि अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. १९७८ मध्ये दिल्ली हायकोर्टात त्या न्यायमूर्ती झाल्या. १९९१ मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले होते. लेखक विक्रम सेठ यांच्या लीला या माता होत. 
 
एका मुलाखतीतलीला सेठ म्हणाल्या होत्या, ‘मी लहानपणी नन होऊ इच्छित होते. मात्र, वडील राजबिहारी सेठ यांच्या मृत्यूनंतर माझे जीवनच बदलले. मी स्वत:च्या पायावर उभी राहावे, असे त्यांना वाटे. तुझ्या लग्नात मी हुंडा देणारच नाही, असे ते नेहमी ठासून सांगत. कायद्याचे शिक्षण माझ्या नशिबातच होते. मी आई झाल्यावर पतीसोबत लंडनला राहिले. तेथेच कायद्याची पदवी घेतली. अनेकदा मला कॉलेजला जाण्यासाठी वेळच मिळत नव्हता. तरीही मी लंडनमध्ये कॉलेजमध्ये अव्वल ठरले.’ लीला म्हणतात, आपल्या मुलांचे संगोपन करताना मुलींसारखीच त्यांना शिकवण द्या. जेणेकरून ही मुलेही प्रेमळ आणि दयाळू होऊ शकतील. भारतीय, अमेरिकी आणि युरोपियन मुलांसाठी या मूल्यांचे महत्त्व वेगवेगळे आहे. एका पुस्तकात लीला यांनी या अनुषंगाने केलेला उल्लेख खूपच बोलका आहे. ‘या तिन्ही भागांतील मुलांना मी एक प्रश्न केला. ही एक बासरी आहे. एका मुलाने ती तयार केली आहे. दुसरा ही बासरी खूप सुंदर वाजवू शकतो. मात्र, तिसऱ्याकडे एकही खेळणे नाही. मग ती कुणाला द्यायला पाहिजे? यावर अमेरिकी मुलाचे उत्तर खूपच वेगळे होते. तो म्हणाला, ज्याने तयार केली त्यालाच ती द्यायला हवी. यावरून लक्षात येते की अमेरिकी मुले मूलभूत अधिकाराबाबत किती जागरूक आहेत. भारतीय मुलगा म्हणाला, ज्याच्याकडे खेळणी नाहीत त्याला ती द्यावी. याचे कारण म्हणजे भारतीय मुलगा प्रेमळ आणि दयाळू होता. 
 
संपत्तीत मुलींना दिला समान हक्क 
लीला सेठ यांनी दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर बलात्कारासंबंधीच्या कायद्यांना नवे कठोर रूप देणाऱ्या वर्मा समितीमध्ये सदस्य म्हणून काम केले. कुटुंबाच्या संपत्तीत मुलींना समान हक्क मिळवून देण्यातही लीला सेठ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 
 
बातम्या आणखी आहेत...