आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये नायब राज्यपालच प्रशासकीय प्रमुख - हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीचे अर्थात दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख नायब राज्यपालच (एलजी) आहेत, असा निकाल देत दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील “आप’ सरकारला जाेरदार दणका दिला. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने राज्य सरकारचे निर्णय नायब राज्यपालांवर बंधनकारक ठरू शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

दरम्यान, सत्तेत आल्यापासून केजरीवाल सरकारने काढलेले अनेक वटहुकूम उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. नायब राज्यपालांच्या संमतीविना काढण्यात आलेले हे वटहुकूम अनधिकृत असल्याचे न्यायालयाने आपल्या १९४ पानी निकालपत्रात म्हटले आहे.
दिल्ली सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील वादासंदर्भात नऊ याचिका एकत्र करून दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील स्थापन करण्यात आलेल्या न्यायपीठासमोर या प्रकरणांची सुनावणी करण्यात आली.
दिल्ली केंद्राच्याच आखत्यारित : दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने हा प्रदेश अद्याप केंद्र सरकारच्या अाखत्यारित असल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारने या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान केला होता.
आपची काय होती मागणी
इतर राज्यांप्रमाणेच दिल्लीतील मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय मानूनर या सरकारच्या सल्ल्यानुसारच नायब राज्यपालांनी कोणतीही हरकत उपस्थित न करता काम करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली होती. मात्र, ही मागणी उच्च न्यायालयाने सपशेल फेटाळली. तसेच, यासंबंधीच्या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या.
दिल्ली क्रिकेट संघटनेवरून वाद
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती. यासंबंधीचा निर्णय नायब राज्यपालांनी फेटाळून लावला होता. तेव्हापासून अनेक मुद्यांवर राज्य सरकार व राज्यपाल यांच्या अधिकार कक्षेवरून वाद पेटला आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईला विरोध
केंद्रातील मोदी सरकार दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईसाठी घेतलेल्या निर्णयांना कायम अटकाव करत आहे. उच्च न्यायालयाने नायब राज्यपालांचे अधिकार मान्य केले असले तरी या निकालास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे दिल्लीत गृह मंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...