नवी दिल्ली - एअर इंडियाने एका रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मदुराईहून चेन्नईला जाणा-याविमानाचे नियोजित वेळेच्या १८ मिनिटे अगोदरच उड्डाण केले. चेन्नईतील एका रुग्णाला हृदयाचे प्रत्यारोपण करण्यासाठी हृदय घेऊन जाण्याकरिता ही घाई करण्यात आली, जेणेकरून गरजवंत रुग्णापर्यंत हे हृदय वेळेत पोहोचू शकेल.
पुण्यातील एका ४८ वर्षीय तरुणास हृदयविकार होता. त्यास तीन आठवड्यांपूर्वी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी २९ वर्षीय तरुण मदुराईत कार अपघातात मृत्युमुखी पडला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे हृदय, मूत्रपिंड, डोळे असे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याबद्दल चेन्नईतील रुग्णालयास याची माहिती मिळाल्यानंतर तेथील डॉक्टर मदुराईत दाखल झाले, परंतु त्या धडधडणा-याहृदयाला गरजवंतापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान होते. डॉक्टरांनी एअर इंडियाशी संपर्क केला.
एअरलाइन्स त्यासाठी तयार झाले. चेन्नई आणि मदुराईमध्ये ट्रॅफिक कॉरिडॉर तयार करण्यात आले. त्यामुळे गरजवंतापर्यंत हे हृदय १९ मिनिटांत पोहोचवणे शक्य झाले. पुण्यातील व्यक्तीला वेळेवर हृदय प्रत्यारोपण करणे शक्य झाले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मदुराईतील मृत तरुणाचे मूत्रपिंड मदुराईतील दोन रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले, तर यकृत चेन्नईला पाठवले.
अवयव दान
मदुराईमध्ये कार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या २९ वर्षीय तरुणाकडून मिळाले हृदय, मूत्रपिंड, डोळे इत्यादी अवयवांचे दान करण्यात आले होते. त्याचे प्रत्यारोपण वेळेत झाल्याने रुग्णाचे प्राण वाचले.