आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भाजपचे फायरब्रँड नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची पहिली कसोटी कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये लागणार आहे. मेमध्ये होणार्या या निवडणुकीत मोदी हे पक्षाचे स्टार प्रचारक असतील, असे संकेत भाजप सूत्रांनी दिले आहेत. दक्षिण भारतातील इतर राज्यांत मोदींच्या प्रतिमेची जादू कितपत चालू शकेल, याचा फीडबॅक घेऊन अहवाल देण्याची जबाबदारी पक्षाने ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांच्यावर सोपवली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 5 मे रोजी मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांनी पक्ष सोडल्याने येथील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यासाठी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दोन दिवसांपूर्वी प्रल्हाद जोशी यांच्यावर सोपवली आहे. इतक्या कमी कालावधीत पक्षाचे डॅमेज कंट्रोल ते करू शकत नाहीत. त्यामुळे पक्षाने प्रचाराची जबाबदारी मोदींसह इतर वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे.
टॉक शोद्वारे मोजणार प्रभाव
कर्नाटकाशिवाय दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत मोदींची लोकप्रियता कितपत आहे, याची चाचपणी भाजप करणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडूंवर ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर घटकांसोबत टॉक शो, ग्रुप टू ग्रुप चर्चेद्वारे नायडू मोदींची चाचपणी करतील. हा कार्यक्रम नागरिकांसाठीही खुला असेल. या मोहिमेची सुरुवात नायडू होळीनंतर करणार आहेत, परंतु आपली मोहीम एक नेता किंवा व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नसून त्याऐवजी पक्ष विस्तारावर भर देणारी असेल, असा दावा नायडू यांनी केला आहे.
मोदींद्वारे येदियुरप्पांवर जाळे
स्टार प्रचारक नरेंद्र मोदी कर्नाटकात पक्षासाठी प्रचारसभा घेणार आहेत. भाजपपुढे या निवडणुकीत जदयू, काँग्रेससह येदियुरप्पांच्या पक्षाचेही तगडे आव्हान असणार आहे. अर्थात येदी जेव्हा पक्षात होते तेव्हा ते मोदींचे सर्मथक व प्रशंसक राहिले आहेत. पक्ष मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करत असेल तर मी पक्षात पुन्हा येण्याबाबत विचार करतो, असे येदींनी म्हटले होते. मोदींना पुढे करून त्यांना पुन्हा खेचून घेण्याचा भाजपचा डाव आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.