नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निकाल देत लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहाणाऱ्या महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले आहे. महिलेने दाखल केलेल्या या प्रकरणात जवळपास 20 वर्षे विविध न्यायालयांमध्ये खटला चालल्यानंतर सुप्रीम कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आहे. ज्या व्यक्तीला पोटगी देण्यास सांगण्यात आले, तो चित्रपट जगताशी संबंधीत आहे. महिला आणि ती व्यक्ती 1986 ते 1995 पर्यंत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यान 1988 मध्ये त्यांना एक मुलगी देखील झाली.
विवाहित आणि चार मुलांचा पिता
लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असलेली व्यक्ती मुंबईची रहिवाशी असून त्याचे लग्न झालेले आहे. तो चार मुलांचा पिता आहे. त्याने कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले, की जर कायदेशीर विवाह झाला असेल तरच महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार असतो. मात्र जस्टिस विक्रमजीत सेन यांनी हा युक्तीवाद फेटाळून लावत त्याला फटकारले. तुम्ही मुर्खपणाच्या गोष्टी करत आहात. कोर्टाने या प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. आता या प्रकरणात त्या व्यक्तीला महिलेला पोटगी देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. महिलेची मुलगी आता 27 वर्षांची झाली असून ती इंजिनिअरिंग करत आहे.
कॉल गर्ल म्हटल्याने कोर्ट संतप्त
त्या व्यक्तीने कोर्टात सांगितले, की जेव्हा महिलेची भेट झाली तेव्हा ती एक कॉल गर्ल होती. यावर कोर्टाने त्याला चांगलेच फटकारले. तुम्ही कोर्टाकडून सहानुभूतीची
आपेक्षा ठेवता, मात्र स्वतः एका गरीब महिलेला कॉल गर्ल म्हणता. महिलेने कोर्टात दावा केला आहे, की त्याने मंदिरात नेऊन माझ्यासोबत लग्न लावले होते.