आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabh Election Conducts In Apirl, Voting Going Five Phases

लोकसभा निवडणुकीचा एप्रिलच्या मध्यात बार, पाच टप्प्यात होणार मतदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा बार यंदा एप्रिल महिन्यात उडणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून 15 एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभर पाच टप्प्यांत ही निवडणूक पार पडेल. निवडणूक कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांत विधानसभा निवडणुकाही घेतल्या जातील.
विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ 1 जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत लोकसभा पुन:स्थापित व्हावी लागेल. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून लेखानुदान मंजूर केले जाईल. त्यानंतर जुलै-ऑगस्टदरम्यान नवे सरकार अर्थसंकल्प सादर करेल. दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून भ्रष्टाचारविरोधी काही उपाययोजनांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
यंदा देशभरात विविध मुद्दय़ांवरून तापलेले राजकारण व दिल्लीत ‘आप’चा उदय यामुळे लोक तसेच राजकीय पक्षांत लोकसभा निवडणुकांच्या तारखांबद्दल उत्सुकता आहे.
मतदार यादी याच महिन्यात जाहीर
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांना अंतिम रूप दिले असून याच महिन्यात याद्या प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात. यंदा निवडणूक पाच टप्प्यांत घ्यावी की सहा टप्प्यांत याविषयी अजूनही आयोगाचा विचार सुरू आहे. देशभर निमलष्करी दले तैनात करण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा करण्यासाठी आयोगाची बैठक होत असून राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यासाठी पोलिस महासंचालकांशी चर्चा करतील.
* 08 लाख मतदान केंद्रांवर 12 लाख मतदान यंत्रे (ईव्हीएम)
* 2.5 लाख मतदान यंत्र निवडणूक आयोगाला फेब्रुवारीत मिळणार
* 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा
2 मार्चला झाली होती.
* 16 एप्रिल ते 13 मेदरम्यान 5 टप्प्यांत मतदान पार पडले.
* नियोजित वेळेनुसार 16 मे रोजी मतमोजणी झाली होती.
* यंदाची निवडणूक
* 80 कोटी मतदार निवडणार 543 खासदार
* 71.4 कोटी 2009 मधील मतदार
* 67.1 कोटी 2004 मधील मतदार
* 1.1 कोटी कर्मचा-यांवर जबाबदारी
* 55 लाख सरकारी कर्मचारी
* 55 लाख सुरक्षा जवान, अधिकारी
तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण
आचारसंहितेमुळे विकासकामांमध्ये बाधा येता कामा नये, असे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत पहिल्या टप्प्यात मतदान होते. तसेच नियमानुसार लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी दोन आठवडे मतमोजणी पूर्ण होणे आवश्यक असते.