आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेसाठी तारखा जाहीर: 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान; 16 मे रोजी मतमोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभर आचारसंहिता लागू झाली. यंदा प्रथमच 9 टप्प्यात मतदान होत आहे. 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान हे मतदान होईल. 16 मे रोजी देशातील सर्व 545 मतदारसंघात मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघासाठी 10, 17 आणि 24 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. याचवेळी निवडणूक आयोगाने तेलंगणा, सीमाध्रं, ओडिशा, सिक्कीम या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या. देशातील हवामान व पावसाचा अंदाज घेऊनच वेळापत्रक तयार केल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त पी. व्ही संपत यांनी सांगितले.
सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मे 2014 पूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर 12 मेला 9 व्या टप्प्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपेल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात या तारखांना होईल मतदान
10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.
10 एप्रिल रोजी विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघात होणा-या मतदानासाठी 15 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. तसेच 22 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. 24 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल तर, 26 मार्चपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.
17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही मतदारसंघासाठी 17 एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी 19 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. तर, 26 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. 27 मार्च रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल व 29 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येतील.
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.
उत्तर महाराष्ट्रात व मुंबई परिसरातील 19 मतदारसंघात 24 एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी 29 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. 5 एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतील. 7 एप्रिलला अर्जांची छाननी होईल व 9 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणखी माहिती वाचण्यासाठी पुढे क्लिक करा...