आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha News In Marathi, Opposition Leader, Sumitra Mahajan, Speaker, Divya Marathi

काँग्रेसने केलेला दावा फेटाळला, सोळाव्या लोकसभेत विरोधी पक्षनेता नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोळाव्या लोकसभेत विरोधी पक्षनेताच राहणार नाही हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने केलेला दावा फेटाळला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात महाजन यांनी काँग्रेसने या पदासाठी केलेला दावा मंजूर केला जाऊ शकत नाही, असे नमूद केले आहे.

सोनियांच्या पत्रानंतर येत्या काही दिवसांत यावर निर्णय घेतला जाईल, असे सभापती महाजन यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत हा निर्णय राखून ठेवला. 14 ऑगस्टला महाजन यांनी सोनियांच्या पत्राला उत्तर दिले. या मुद्द्यावर सभागृहात गदारोळ होऊ नये म्हणून त्यांनी अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतरच निर्णय घेतल्याचे दिसून येते.

मे महिन्याच्या मध्यास 16 वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित झाला. यावर फक्त 44 सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसला हे पद कसे मिळू शकते, यावर अनेक कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांनी मत मांडले. यामुळे एकप्रकारे सभापतींवर अप्रत्यक्ष दबाव आला होता. कमलनाथ, अमरिंदरसिंग, राजीव शुक्ला यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी सभापती महाजन केंद्र सरकारच्या दबावाखातर निर्णय घेत नसल्याची टीकाही केली होती. माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांनी यावर मत मांडताना विद्यमान सभापतींना असलेले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पाहता त्या एखाद्या नेत्याचे नाव जाहीर करू शकतात, असे म्हटले होते.

कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय : खरगे
दरम्यान, कॅबिनेट दर्जाचे विरोधी पक्षनेतेपद हुकल्याने खरगे आता कायदेशीर सल्ला घेत आहेत.मंगळवारी त्यांनी त्यास दुजोरा दिला. पक्षश्रेष्ठी व पक्षाच्या विधी सेलकडून सल्ला घेतल्यानंतर पुढील पाऊले उचलली जातील असे खरगे यांनी सांगितले.

जुन्या संदर्भांचा आधार
सभापती महाजन यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारताना जुन्या संदर्भांचा आधार दिला आहे. तत्कालीन ज्येष्ठ सभापतींचे आदेश, त्यांनी दिलेले निर्देश आणि 1953 मध्ये लोकसभेचे पहिले सभापती गणेश मालवणकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ महाजन यांनी हा निर्णय सोनियांना कळवताना दिला आहे.

कॉंग्रेसचा दावा फेटाळण्याची कारणे
लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण 543 पैकी दहा टक्के जागा हव्या असतात.त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडे 55 जागा असल्या पाहिजेत. परंतु त्यांचे केवळ 44 खासदार आहेत. सन 1980 व 1984 चाही उल्लेख पत्रात आहे. या दोन्ही वेळेस लोकसभेत कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले नव्हते.