आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha News In Marathi, Varun Gandhi, Rahul Gandhi

लोकसभेत वरुण गांधी यांच्यापेक्षा राहुल मागे; उपस्थिती, चर्चांमध्‍ये बेताचाच सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंधराव्या लोकसभेमधील तरुण चेहरे जयंत चौधरी, दीपेंद्रसिंह हुड्डा, धर्मेंद्र यादव, सारिकासिंह बघेल, अनुराग ठाकूर आणि हमदुल्ला सईद भलेही वेगवेगळ्या पक्षाचे असतील, मात्र त्या सर्वांमध्ये एक साम्य दिसून येते. मावळत्या लोकसभेत तरुण खासदारांच्या उपस्थितीचे प्रमाण चांगले राहिले.


लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार पिलिभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांची उपस्थिती 63 टक्के होती. त्यांनी 641 प्रश्न विचारले आणि दोन चर्चांमध्ये भाग घेतला. काँग्रेसच्या राहुल गांधी यांची उपस्थिती 43 टक्के राहिली आणि त्यांनी केवळ दोन चर्चांमध्ये भाग घेतला. त्यांनी कोणताही प्रश्न विचारला नाही. बंगळुरूचे काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांची सभागृहात 100 टक्के उपस्थिती होती. त्यांनी 12 प्रश्न विचारले, मात्र चर्चेत भाग घेतला नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र, भाजप खासदार दुष्यंत सिंह यांची उपस्थिती 70 टक्के होती. त्यांनी 351 प्रश्न विचारले आणि 31 चर्चांमध्ये भाग घेतला. रालोदच्या सारिकासिंह बघेल यांच्या उपस्थितीचे प्रमाणे 90 टक्क्यांपेक्षा जास्त होते.
हजेरीत अव्वल
93 टक्के उपस्थिती नोंदवणा-या खासदारांमध्ये माकपचे एम. बी. राजेश यांचा समावेश आहे. त्यांनी 134 चर्चांमध्ये भाग घेतला आणि 513 प्रश्न विचारले. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चनुसार, रालोदच्या जयंत चौधरी यांची उपस्थिती 83 टक्के, दीपेंद्र हुड्डा-81, मिलिंद मुरली देवरा-88, बसपाच्या श्रुती चौधरी 81, भाजपचे अनुराग ठाकूर- 85 टक्के आणि माकपच्या सुश्मिता बाउरी यांची 94 टक्के उपस्थिती होती.
सीएमच्या पत्नीची कामगिरी ढिसाळ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांची उपस्थिती केवळ 22 टक्के राहिली. त्यांनी कोणत्या चर्चेत भाग घेतला नाही, कुठला प्रश्न विचारला नाही की खासगी विधेयक सादर केले नाही. अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त कन्नौज मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून त्या खासदार झाल्या.
सर्वात तरुण खासदारांनी सादर केली दोन खासगी विधेयके
मावळत्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार लक्षद्वीपचे काँग्रेस खासदार हमदुल्ला सईद यांची 78 टक्के उपस्थिती होती. त्यांनी 36 चर्चांमध्ये भाग घेतला आणि 631 प्रश्न विचारले. त्यांनी दोन खासगी विधेयकेही सादर केली. लोकसभेच्या हाय प्रोफाइल सदस्यांमध्ये राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मंदसौरच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांची उपस्थिती 84 टक्के राहिली. त्यांनी 135 प्रश्न विचारले तसेच 16 चर्चांमध्ये भाग घेतला.