आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे कामकाज दोन दिवस आधीच गुंडाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन संपण्यास दोन दिवसांचा अवधी असतानाच लोकसभेच्‍या अध्‍यक्ष मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी करण्‍याची घोषणा केली. अधिवेशनाच्‍या दुस-या टप्‍प्‍यात एकही दिवस कामकाज झाले नाही. विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, कायदा मंत्री अश्विनीकुमार तसेच रेल्‍वेमंत्री पवनकुमार बन्‍सल यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी करतानाच प्रचंड गोंधळ घातला. त्‍यामुळे उर्वरीत दोन दिवसांचेही कामकाज होण्‍याची शक्‍यता नसल्‍यामुळे कंटाळून मीरा कुमार यांनी हा निर्णय घेतला.

राज्‍यसभेचे कामकाजही त्‍यानंतर अनिश्चित काळासाठी स्‍थगित करण्‍यात आले. सभापती हा‍मीद अन्‍सारी यांनी यासंदर्भात घोषणा केली. राज्‍यसभेतही आज कामकाज होऊ शकले नाही.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून कोंडी निर्माण झाली होती. ती फोडण्‍यात सरकारला अपयश आले. त्‍यातच आज कर्नाटकमध्‍ये कॉंग्रेसला बहुमताचे संकेत मिळाल्‍यानंतर सरकारने विरोधकांची मनधरणी करण्‍याचे प्रयत्‍नही केले नाही. आज कामकाज सुरु होताच अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच कायदा मंत्री अश्वनी कुमार आणि रेल्वे मंत्री पवन कुमार बंसल यांच्या राजीनाम्याची मागणी आजही करण्यात येत होती. लोकसभेचे अध्यक्ष मीरा कुमार यांनी दुपारपर्यंत कामाकाज स्थगित केले. मात्र दुपारी 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गोंधळास सुरुवात केली. त्‍यानंतर मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्‍थगित केले.