आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलनंतर मोदी सरकारचा आणखी एक झटका, गॅस सिलिंडर दरात 16.50 रुपये वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'अच्छे दिन' येणार अशी हळी देऊन सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला एका मागून एक धक्के देण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केल्यानंतर आज विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 16 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी रेल्वे भाडेवाढीचा 'जोर का झटका' मोदी सरकारने दिला होता. आता हा तिसरा मोठा झटका देऊन सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.
महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काँग्रेसच्या विरोधात जनमत तयार करुन लोकसभा निवडणूकीत त्याचा पुरेपूर फायदा उचलला मात्र, सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करु असे आश्वासन देणारे जनतेचा जराही विचार करत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हवाई सफर महागणार ?
जेट फ्यूअल दर वाढीमुळे एअरलाइन्स कंपन्यांवर तिकीट दरवाढीचे संकट येण्याची शक्यता आहे. कारण, एअरलाइन्सच्या एकूण खर्चापैकी 40 टक्के वाटा हा जेट फ्यूअलचा असतो. अद्याप मात्र, कोणत्याही विमान कंपनीने तिकीट दरवाढीवर टिप्पणी केलेली नाही.
दिल्लीत 921.50 रुपये दराने सिलिंडर
अनुदानित सिलिंडरची संख्या 12 आहे. त्यानंतरच्या घरगुती गॅस सिलिंडरसाठी विनाअनुदानित दराने ग्राहकांना पैसे मोजावे लागतात. त्यात आता 16.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत 14.2 किलोचे विनाअनुदानित सिलिंडर 905 रुपयांना मिळते. त्याचा दर आता 921.50 रुपये झाला आहे. तर, अनुदानित सिलिंडरचा दर 414 रुपये आहे. या सिलिंडरवर दिल्या जाणा-या अनुदानामुळे कंपनीला एका सिलिंडरमागे 449 रुपयांचा तोटा होतो. जानेवारीमध्ये हा तोटा 762.50 रुपये एका सिलिंडरमागे होत होता.

गेल्या सहा महिन्यात प्रथमच वाढले दर
विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या सहा महिन्यात प्रथमच ही दरवाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात यात कपातच होत होती. मोदी सरकारने यात प्रथमच वाढ केली आहे.
महीना कपात (रुपयांमध्ये) किंमत
फेब्रुवारी 107 1,134
मार्च 53.50 1,080.50
एप्रिल 100 980.50
मे 52 928.50
जून 23.50 905