नवी दिल्ली / वडोदरा - मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून आता त्यात माजी सरसंघचालक, दिवंगत के. एस. सुदर्शन व संघनेता सुरेश
सोनी यांचे नाव पुढे आले आहे. विशेष तपास पथकाच्या चौकशीतून हा खुलासा झाला असून मुख्य आरोपी व माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी सुदर्शन यांच्या सहकार्याच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
भरती परीक्षा आयोजित करणारी संस्था व्यापमचे (व्यावसायिक परीक्षा मंडळ) माजी परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदीने हा दावा केला आहे. त्रिवेदीने चौकशी पथकाला सांगितले की, वजनमापे निरीक्षक परीक्षेत पाटण्याच्या मिहिर कुमारसह पाच विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी लक्ष्मीकांत शर्मा यांनी शिफारस केली होती. त्यांनी दिलेल्या यादीत मिहिर हा सोनीजींचा माणूस असल्याचे नमूद केले होते. मिहिर तेव्हा सुदर्शन यांच्यासोबत काम करत होता. मिहिरला परीक्षेत 200 पैकी 159 गुण मिळाले होते व त्याची निवड झाली होती.
काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार
दरम्यान, काँग्रेसने याप्रकरणी मुख्यमंत्री
शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची त्यांच्या घरासमोर जोरदार निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व पाण्याचा मारा केला. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शिवराज सिंह यांना बदलाची शक्यता फेटाळून लावली आहे.
(संग्रहित छायाचित्र - माजी सरसंघचालक सुदर्शन)