नवी दिल्ली - ‘बस! दोन मिनट में तैयार' होणा-या मॅगीची आता देशभरातील स्वयंपाकघरांतून हकालपट्टी झाली आहे. भारताच्या अन्न सुरक्षा नियामक आयोगाने मॅगी इन्स्टंट नूडल्स सर्व ९ व्हरायटीजच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तथापि, मॅगी नूडल्स उत्पादक कंपनी नेस्लेचे सीईओ पाॅल बल्क यांनी मात्र आमचे प्राॅडक्ट्स पूर्णपणे सुरक्षित असूनही आम्ही बाजारातून माघार घेत आहोत, असे स्पष्ट करतानाच लवकरच परत येऊ, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
मॅगी नूडल्समध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त स्वरूपात शिसे (लेड) आणि मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आढळून आल्याने वादंग उठले होतेे. अर्थात फूड सेफ्टी अॅथाॅरिटीचे आदेश येण्याआधीच नेस्ले इंडियाने गुरुवारी मध्यरात्री मॅगी नूडल्स माघारी घेण्याची घोषणा केली होती. परंतु त्याआधीच दिल्लीसह सात राज्यांत त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. शुक्रवारी मध्य प्रदेश, आसाम, बिहार आणि नागालँडनेही बंदी घातली. दरम्यान, नेपाळपाठोपाठ सिंगापूरनेही भारतातून आयात होणा-या मॅगीची विक्री थांबवली आहे.
फूड सेफ्टी अॅथाॅरिटीने म्हटले आहे की, कंपनीने उत्पादन, प्रोसेसिंग, इम्पोर्ट, वितरण आणि विक्री तत्काळ बंद करावी. कंपनीने नेस्ले इंडियाला तीन दिवसांत कारवाईचा अहवाल देण्यास सांगितले आहे. आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, सर्व राज्यांचे अहवाल मिळाले. मॅगीत सुरक्षेचे मापदंड पाळले जात नसल्याचे त्यात नमूद आहे. त्यामुळे ती बाजारातून काढून घ्यावी असे ठरवण्यात आले.
प्राॅडक्ट सुरक्षित, सध्या माघार, परत येऊ : नेस्ले
प. बंगालात दिलासा, आक्षेपार्ह काही नाही
नेस्लेसाठी दिलासादायक बाब म्हणजे प. बंगालमध्ये मॅगीत काहीही गडबड आढळलेली नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला आक्षेपार्ह काहीही आढळलेले नाही. त्यामुळे आम्ही काेणतीही कारवाई केलेली नाही.
पूर्वी चाॅकलेट, मीट, आटाही मागे घेतला
प्लास्टिकचे तुकडे आढळल्याने नेस्लेला चंकी किटकॅट चाॅकलेट २०१३ मध्ये ब्रिटनमध्ये मागे घ्यावे लागले होते. अमेरिकेत २००९ मध्ये बिस्कीट आटा, काचेचे तुकडे आढळल्याने बेबी फूडवरही संक्रांत आली होती.
मॅगीकडून नियमाची ऐशीतैशी
>मॅगीत लेड म्हणजे शिसे प्रमाणापेक्षा जास्त.
>‘नो अॅडेड एमएसजी’चे लेबल लावून दिशाभूल.
>ओट मसाला नूडल्स टेस्टमेकर विनापरवाना विक्री.
ब्रिटनमध्येही होणार मॅगीची तपासणी
ब्रिटनच्या फूड सेफ्टी एजन्सीनेही मॅगी नूडल्सचे नमुने तपासण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील तपासणीच्या निष्कर्षांना पुष्टी देण्यासाठी ही कार्यवाही होईल. नेस्ले यूकेच्या विक्री होणा-या उत्पादनांबाबत अडचण नाही. खबरदारी म्हणून तपासणी करत आहोत, असे एजन्सीने म्हटले आहे.
प्रयोगशाळांतील तफावत तपासणार
जगभरातलीच प्रक्रिया भारतात मॅगी बनवताना वापरतो. भारत सरकार व कंपनीच्या लॅबच्या अहवालात तफावत कशी येते, याची तपासणी करू. हजार पाकिटांच्या तपासणीत लेड आढळले नाही.- पाॅल बल्क, सीईओ, नेस्ले
पुढे वाचा, महाराष्ट्रातही बंदी, व्यापा-यांनी विक्री केल्यास कारवाई