आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Polls: Narendra Modi Tells BJP Workers To Work For 'Congress free' State

महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, नरेंद्र मोदींचा खासदारांना कानमंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य शंभरी गाठण्याचे असावे. त्यासाठी प्रत्येक खासदाराने त्याच्या मतदारसंघात येणार्‍या विधानसभा मतदारसंघांमध्ये लक्ष घालावे. जिथे भाजपचे उमेदवार नसतील अशा खासदारांनी अन्य मतदारसंघांतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला लागावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील भाजपच्या खासदारांना दिल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानालगतच्या 7 रेसकोर्स रोड येथील कार्यालयात सायंकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची बैठक घेतली. एक तासाची नियोजित बैठक 45 मिनिटांतच आटोपण्यात आली. बैठक संपल्यानंतर खासदारांनी तोंडावर बोट ठेवणेच पसंत केले.

एका खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी सर्व खासदारांचा परिचय करून घेतला. यावेळी नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. लोकसभेतील कामकाजाची माहिती मोदींनी खासदारांकडून जाणून घेतली, तर काहींना त्यांच्या अडचणीही विचारल्या. परंतु त्यावर कोणीही भाष्य केले नाही. मात्र, तुम्ही आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे. राज्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत जराही हलगर्जी करून चालणार नाही, अशी ताकीदही देण्यात आली. मोदींनी खासदारांना अनेक कानमंत्र दिले. मात्र त्याची वाच्यता करायची नाही, अशा सूचनाही दिल्या.

शिवसेना खासदार अस्वस्थ
पंतप्रधान मोदी दररोज एका राज्यातील भाजपच्या खासदारांची बैठक घेत आहेत. हे शिवसेनेच्या खासदारांना रुचले नाही. शिवसेना हे रालोआचे घटक पक्ष असल्याने आम्हालाही बैठकीला बोलवायला हवे होते. आमच्या खासदारांना बैठकीला न बोलवून मोदींनी आपला कोतेपणा दाखवून दिला आहे. त्यांना फक्त भाजपचेच खासदार प्रिय वाटत असतील तर भविष्यात मोदींबाबत कटुता निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या विदर्भातील एका खासदाराने दिली.