आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chief Minister\'s Office Knew Of Force feeding Incident Same Day

महाराष्ट्र सदनातील रोटी कोंबल्याच्या वादाला मुख्यमंत्र्यांनीच दिली फोडणी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - घटनेचा फाईलफोटो
मुंबई : महाराष्ट्र सदनात मुस्लीम कर्मचा-याच्या तोंडात रोटी कोंबण्याचा प्रकार माध्यमांनी वृत्त दिल्यानंतर (घटनेच्या पाच दिवसांनी) समजल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पण
त्यांना घटनेच्या दिवशीच महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी या घटनेबाबात माहिती दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. घटनेच्याच दिवशी सायंकाळी मलिक यांनी यासंदर्भात अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केला होता.

यासंदर्भात मलिक यांनी दुस-या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाला एक गोपनीय अहवाल पाठवून सविस्तर माहिती दिल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे. तसेच घटनेच्या तीन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनाला भेट दिली त्यादिवशीही मलिक यांनी त्यांना प्रत्यक्ष माहिती दिल्याचे समजते आहे. या गोपनीय अहवालानुसार मलिक यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव, सचिव आणि खासगी सचिव या सर्वांना घटनेच्या दिवशी सहा वाजता माहिती दिली होती.

एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार या घटनेच्या दुस-याच दिवशी मलिक याने कँटीनच्या सुपरवायझरला माफीचे पत्र सादर केले होते. गोपनीय अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पुढे काय पावले उचलायची या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव जे.एस.सहारिया आणि अतिरिक्त मुख्य सचिव (प्रोटोकॉल) सुमीत मलिक यांच्याकडे सल्लाही मागण्यात आला होता.

20 जुलै रोजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी जेव्हा महाराष्ट्र सदनला जेव्हा भेट दिली त्यावेळीही त्यांना याबाबात माहिती देण्यात आली होती. तसेच यासंदर्भात कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचेही सांगण्यात आले होते. तसेच या प्रकारानंतर आयआरसीटीसीने महाराष्ट्र सदनातील केटरिंगची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांना देण्यात आली होती, असेही या अधिका-याने सांगितले आहे.

रमजानच्या काळात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून शक्य तेवढ्या पातळ्यांवर शांततेने हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती या अधिका-याने दिली. मात्र माध्यमांनी हे प्रकरण उचलल्यानंतर लगेचच चव्हाण यांनी सहारिया यांना या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले, अशेही त्यांनी सांगितले.