नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी शनिवारी पक्षाच्या समीक्षा समितीसमोर ‘मी नाही तू..!’ म्हणत एकमेकांची उणीदुणी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनी समितीसमोर स्वतंत्रपणे मते मांडली. यात स्वत: चव्हाण यांनी ‘जबाबदार्या सोपवा, धाडसी निर्णय घ्या’, असे सांगत पराभवाची कारणे कथन केली. तर, नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचाच समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गार्हाणी करण्यापेक्षा पटापट निर्णय घेण्याची गरज बोलून दाखवत आपल्यातील नेतृत्वगुण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
ए. के. अँटनी यांच्या समितीमध्ये मुकुल वासनिक, अविनाश पांडे व रामचंद्र खुटिया उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी 35 मिनिटे पराभवाची मीमांसा केली. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने संबंधितांवर जबाबदारी सोपवली पाहिजे, याकडेही लक्ष वेधले.
तीन तास आरोप.. अन् आरोपच!
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, मुंबई प्रदेश अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, माजी मंत्री गुरुदास कामत, माजी खासदार विलास मुत्तेमवार, शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत दायमा, संजय निरुपम, शिवाजीराव निलंगेकर आणि मोहन प्रकाश या दिग्गजांशी समितीने चर्चा केली. या नेत्यांची मते जाणून घेतली. बैठकीत तीन तास अनेक नेत्यांनी पक्षर्शेष्ठी, संघटना आणि राज्य सरकारवर आरोप केल्याचे समजते.
दु:ख सोडा, जोमाने कामाला लागा
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, ‘लोकसभेत जे झाले त्याचे दु:ख करत बसण्यापेक्षा नव्या जोमाने आम्ही कामाला लागत आहोत. राज्यात येत्या 3 जुलै रोजी कॉँग्रेस नेत्यांच्या विभागवार बैठका घेतल्या जातील. विधानसभेत कॉँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहील.
नेतृत्वबदलावर कार्यकर्ते संभ्रमात
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या येत आहेत. परंतु पक्षाने खुलासा केला नसल्याने जनता तर सोडाच, कॉँग्रेसचे पदाधिकारीही संभ्रमात आहेत. नियोजनाच्या अभावामुळे अद्यापही विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरली नाही, अशी तक्रार शिवाजीराव मोघे यांनी केली.