आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra CM Prithviraj Chavan News In Marathi

मुख्यमंत्री चव्हाण, माणिकराव सोनिया दरबारी, नाराजी दूर करण्याचा केला प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी करीत पतंगराव कदम यांच्यासह काही कॉंग्रेस नेत्यांनी-मंत्र्यांनी काल (गुरुवार) सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. परंतु, महाराष्ट्रात नेतृत्व बदलाला सोनिया गांधी यांनी नकार दिला असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात कॉंग्रेसने सपाटून मार खाल्ला आहे. महाराष्ट्रातून कॉंग्रेसच्या केवळ दोन जागा निवडून आल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. केंद्र आणि राज्य सरकार विरोधी नाराजीची लाट कायम राहिली तर राज्यातूनही कॉंग्रेसचा सफाया होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधकांनी ही संधी साधली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रथम नारायण राणे यांनी ही मागणी केली होती. आता पतंगराव कदम यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे काही नेते-मंत्री काल सोनिया गांधी यांना भेटले. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना हटविण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. परंतु, सोनिया गांधी यांनी नेतृत्व बदलास ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे चव्हाण यांच्यावर आलेले संकट तुर्तास तरी टळलेले आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. परंतु, आगामी विधान परिषद निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी उभय नेते सोनिया यांना भेटल्याचे पक्षाने सांगितले आहे. नेतृत्व बदलासंदर्भात ही भेट नव्हती असेही स्पष्ट केले आहे.
सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि सोनिया यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल उपस्थित होते. पुणे शिक्षक मतदार संघ, नागपूर पदवीधर मतदार संघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
महाराष्ट्रातून निवडून आलेल्या दोन खासदारांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राज्यात नेतृत्व बदल व्हावा, असेही म्हटले आहे.