आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळावर लढलो तर 245 जागा मिळतील : भाजपचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत योग्य जागा मिळण्यासाठी राज्यातील भाजप नेते पुन्हा आग्रही झाले आहेत. योग्य जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची त्यांची तयारी आहे. राज्यातील नेत्यांच्या या मागणीला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हिरवा कंदील दाखवल्याने या नेत्यांचे मनोबल वाढले आहे. म्हणूनच स्वबळावर लढल्यास 288 पैकी 245 जागा जिंकता येतील, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. महाराष्ट्रात या निवडणुकीत चांगले परिणाम पाहायला मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि फडणवीस यांनी विधानसभेत 2009 प्रमाणे शिवसेनेसोबतच्या 119/169 या विभागणीला तयार व्हायचे नाही असे ठरविले होते. राज्यातील आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला विधानसभेसाठी अनुकुल वातावरण असल्याचे दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक चर्चेत ही गोळाबेरीज मान्य केली. मात्र, शिवसेना आणि अन्य चार असे एकूण सहा पक्षांची आमची महायुती असल्याने भाजपला स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढविण्याची वेळ येणार नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपला राज्यात अनुकूल वातावरण असले तरी शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे त्यांच्यासोबत लवकरच वाटाघाटी होतील. परंतु या वेळी कोणत्याही परिस्थितीत भाजप 119 आणि शिवसेना 169 असे सूत्र असणार नाही. या वेळी कमी किंवा 50-50 हा नियमही लागू होणार नाही. महायुतीमध्ये एकट्या भाजपला 120 जागांवर विधानसभेत विजय मिळणार असल्याचे भाकीत फडणवीस यांनी केले. पंतप्रधान मोदी हेही जास्त जागांसाठी आग्रही आहेत. जागावाटपाच्या बाबतीत अंतिम निर्णय त्यांचाच असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

15 ऑगस्टपर्यंत उमेदवार जाहीर
सहयोगी पक्षही अव्वाच्या सव्वा जागा मागत आहेत परंतु त्यांना किती जागा मिळू शकतात आणि आम्ही किती जागा देऊ शकतो हे त्यांना चांगले ठाऊक आहे या महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात महायुतीची बैठक होत असून त्यात वाटाघाटीवर चर्चा होईल. 15 ऑगस्टपर्यंत भाजपच्या सर्वच उमेदवारांची नावे जाहीर करू असेही फडणवीस म्हणाले.

विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल! - फडणवीस
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणून माझे भविष्य सांगितले जाते, परंतु मला व्हायचेच झाल्यास मी विदर्भाचा मुख्यमंत्री होईन. ते मला जास्त आवडेल, असे सांगत लवकरच विदर्भ राज्याची निर्मिती होईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भ राज्याच्या मुद्दय़ावरून दिशाभूल करीत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केला होता. त्याचे खंडन करताना फडणवीस म्हणाले, मी आणि गडकरी यांनीही विदर्भ राज्याचा शब्द दिला असून तो आम्ही पाळणार आहोत. योग्य वेळी आम्ही हा निर्णय घेऊ. यासाठी कोणता मित्रपक्ष नाराज होणार ही बाब आमच्यासाठी गौण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भ राज्य होण्यासाठी अधिकाधिक एक वर्षाचा काळ लागेल.