आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Got First Prize To Maharashtra Float In Republic Day Parade

विठ्ठलाचा आशीर्वाद: महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पहिले बक्षीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - राजपथावर सादर झालेला महाराष्ट्राचा चित्ररथ
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी राजपथावर ओबामांना विविध राज्यांच्या चित्ररथाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले बक्षीस मिळाले आहे. महाराष्ट्राने यावर्षी महाराष्ट्राचा सोहळा सादर केला होता. अजय अतुल यांच्या गाजलेल्या माऊली...माऊली... गाण्याने या चित्ररथाच्या सौदर्यात अधिकच रंग भरले होते. अखेरच पहिले बक्षीस मिळाल्याने सर्वांच्या प्रयत्नांना विठ्ठलाचा आशीर्वाद पहिल्या क्रमांकाच्या रुपाने मिळाला आहे.

राजपथवरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राकडून पंढरीची वारी चित्ररथ तयार करण्यात आला होता. महाराष्ट्रासह 16 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे एकूण 25 चित्ररथ राजपथवरील पथसंचलनात सहभागी झाले होते.

महाराष्ट्राचे दैवत आणि वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना घडवण्यात आले. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिध्द कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 65 कारागिरांनी अतिशय देखणा असा हा चित्ररथ उभारला होता.

चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्रीचा फिरता पुतळा होता. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर आढळणारे सात्विक भाव या मूर्तीच्या चेहर्‍यावर रेखाटण्यात शिल्ककारांना यश आले होते. जणू खरी वारकरी महिलाच ही तुळस घेऊन जात असावी असा भास त्यामुळे क्षणभर होत होता. तसेच त्यापाठोपाठ अश्वांचे रिंगणही चित्ररथावर होते. चित्ररथाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीही बसवण्यात आल्या होत्या. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पताका, टाळ, मृदंग, वीणेसह वारीत सहभागी वारकर्‍यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या होत्या.
लय भारी चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या अशा अजय अतुल यांच्या माऊली माऊली गाण्यावर राजपथावर सादरीकरण करण्यात आले. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कलाकारांच्या पथकाने चित्ररथाबरोबर सादरीकरण केले.
मुख्यमंत्र्यांकडून कलावंतांचे अभिनंदन
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या ‘पंढरीची वारी’ चित्ररथाने सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे.
या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे लोकदैवत आणि लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. चित्ररथाची संकल्पना साकारणारे कारागीर तसेच त्यासोबत सहभागी झालेल्या कलावंतासह सांस्कृतिक विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा राजपथावर झालेल्या सादरीकरणाचे PHOTO
फोटो सौजन्य - दूरदर्शन