आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Got First Prize To Maharashtra Float In Republic Day Parade

आधी धार्मिक म्हणून नाकारलेला महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिन संचलनात सादर झालेल्या महाराष्ट्राच्या "पंढरीची वारी' चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. एकूण २५ चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ६५ कारागिरांनी चित्ररथ उभारला. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ कलाकारांच्या चमूने राजपथावर त्याचे सादरीकरण केले होते.
नागपूरची लेझीम व्हाइट हाऊसच्या वेबसाइटवर
राजपथावर सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत नागपूरच्या लेझीमनेही बाजी मारली. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे सादर केलेेल्या या लेझीम नृत्याला प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. ‘हा नागपूरसह महाराष्ट्राचा विजय आहे,’ अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी दिली. या नृत्यासाठी २२ शाळांमधून १६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पद्मश्री पुरस्कार विजेते कलावंत आणि नृत्य दिग्दर्शकांनी त्यांना प्रशिक्षण दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही हे नृत्य खूप आवडले. त्यांनी ‘व्हाइट हाऊस’च्या वेबसाइटवर या नृत्याचा फाेटाे टाकला आहे, असे डॉ. पीयूषकुमार म्हणाले.
अजय- अतुलच्या गाण्यात बदल
या चित्ररथाच्या संचालनात ‘लय भारी’ चित्रपटातील अजय- अतुल यांचे ‘माउली’ गीत वापरायचे होते. त्यांची अनुमती घेतली. मात्र, या गाण्यात आम्हाला काही बदल हवे होते. अजय यांचा आवाजाचा ट्रॅक वाढवून घ्यायचा होता. टाळ मृदंगाच्या ट्रॅकमध्येही बदल हवे होते. अजय- अतुलसोबत बसून आम्ही हे बदल करून घेतल्याचेही पाटील यांनी सांगितले.
पंढरीत तीन दिवस मुक्काम, वारकऱ्यांचे निरीक्षण : मोरे

कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी या चित्ररथाची निर्मिती केली आहे. त्यांनी दिल्ली बेल्ली, रॉक ऑन, हॅप्पी न्यू इयर, दिल धडकने दो या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. ‘चित्ररथ तयार करताना वारीचा २०० किमीचा प्रवास ५० फुटांच्या चित्ररथात कसा दाखवायचा? हा प्रश्न होता. मी आजवर कधीही वारीला गेलो नाही. मात्र, चित्ररथाच्या तयारीसाठी ३ दिवस पंढरपुरात जाऊन राहिलो. तेथे येणारे वारकरी, त्यांचा जोष, त्यांची भक्ती, त्यांची वेशभूषा यांचे बारकाईने निरीक्षण केले. वारी संदर्भातील अनेक छायाचित्रांचा अभ्यास केला,’ असे मोरे म्हणाले.
नाशिकचा ‘गोंधळ’ निनादला
‘पंढरीची वारी’च्या संचलनात ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातील ‘आई भवानी तुझ्या कृपेने’ हा गोंधळही निनादला. हा संपूर्ण चित्रपट नाशिकचाच आहे. इरा फिल्म नावाने दिवंगत निर्माते प्रशांत पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली, तर दिग्दर्शन दिवंगत राजीव पाटील यांचे होते. या गाण्याचे चित्रीकरण काळाराम मंदिरात झाले होते, तर नाशिकचे अभिनेते अरुण गीते यांनी गाण्यावर नृत्य केले होते. ‘पारितोषिक मिळाल्याचा आनंद आहेच. मात्र, आज आनंद साजरा करायला निर्माते आणि दिग्दर्शक हयात नाहीत यासारखे दुर्दैव काय,' अशा भावना अभिनेते अरुण गिते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या.

यापूर्वीची बक्षीसे
१९९३ : गणेशोत्सव शताब्दी वर्ष
१९९४ : हापूस आंबा
१९९५ : बापू स्मृती
१९८० : शिवराज्याभिषेक
१९८३ : बैल पोळा
१९८८ : टिळकांवरील खटला
२००७ : जेजुरीचा खंडेराय
२००९ : धनगर समाज
वारकऱ्याच्या रूपात आई
-चित्ररथाच्या दर्शनी भागात दाखविलेली स्त्री ही माझी आई लक्ष्मीबाईची प्रतिकृती आहे.
चंद्रशेखर मोरे, कला दिग्दर्शक
धार्मिक नव्हे सांस्कृतिक
-वारी हा धार्मिक विषय असल्याने तो टाळण्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र, वारी ही राज्याचे सामाजिक व सांस्कृतिक संचित असल्याचे आम्ही लक्षात आणून दिले.
संजय पाटील, तत्कालीन सांस्कृतिक संचालक