आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दालन: पाच लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट- सुभाष देसाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या चार वर्षात महाराष्ट्रात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणुक होईल व २० लाख नवे रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी व्यक्त केला. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उदघाटन देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रा, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक शिवाजी दौंड यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, गेल्या वर्षी महाराष्ट्रात ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ५० हजार नवे रोजगार उपलब्ध झाले आहेत. लघु लद्योगास चालना देण्यासाठी सिडबी मार्फत २०० कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करुन देण्यात आले असून राज्य सरकारने त्यासाठी ७५ कोटींचा निधी पुरवला आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडोअरचे काम सुरु असून औरंगाबाद जवळ ४ हजार हेक्टर जमीन यासाठी उपलब्ध आहे. तेथे शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीचे कामही लवकरच सुरु होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लक्षवेधी "कौन बनेगा उद्योगपती'
"कौन बनेगा उद्योगपती' हा सेट प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर हा सेट उभारण्यात आला आहे. हॉट सीटवर आज उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील विराजमान झाले व त्यांनी संगणकावरील प्रत्येक पर्यांयांची माहिती घेतली. या प्रदर्शनात राज्यातील महिला बचत गटाचे स्टॉल्सही मोठ्या संख्येने आहेत. बॉलीवूडच्या माध्यमातून उद्योगप्रवास दर्शविणारे महाराष्ट्र दालन सर्वांना आकर्षित करीत आहे.
बातम्या आणखी आहेत...