आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या कलाकृतींनी दिल्लीहाट गजबजले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र हस्तकला महोत्सवाला दिल्लीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात सहभागी महाराष्ट्रातील कारागीर गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी गुढी उभारून मराठमोळया पद्धतीने सण साजरा करणार आहेत. गेल्या 20 वर्षांपासून दिल्लीकरांना मराठी खाद्यपदार्थांची मेजवानी देणार्‍या दिल्लीहाट येथील महाराष्ट्र फूड स्टॉलच्या वर्धापनदिनी 2९ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही सादरीकरण होणार आहे.

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या वतीने दिल्लीहाट येथे 1६ ते 31 मार्च या कालावधीत ‘महाराष्ट्र हस्तकला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या हस्तकला कारागिरांचे एकूण 2७ स्टॉल्स सुरू आहेत. कोल्हापूर येथील कोल्हापूर चप्पल मार्टतर्फे लावण्यात आलेला कोल्हापुरी चप्पल स्टॉल, जळगाव जिल्ह्यातील बचत गटांचे प्रतिनिधित्व करणार्‍या रेखा चौधरी यांच्या स्टॉलवरील बेदाणा, पापड आणि हळद, नागपूरच्या नसीम बानो यांचा मोतीशिल्प व नागपूरच्या रमनी पंतुला यांचा पेपर मॅशपासून तयार केलेल्या विविध देवी-देवतांच्या मूर्तींचा स्टॉल, पुण्यातील संतोष पाटील यांचा दागदागिन्यांचा स्टॉल, औसा (जि. लातूर) येथील बंजारा महिला कला विकास केंद्राचा बंजारा ड्रेस व दागदागिन्यांचा स्टॉल दिल्लीकर ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

ग्राहक प्रतिसादामुळे कलाकार उत्साहित
दररोज सायंकाळी या स्टॉलवर येणारी नागरिकांची गर्दी आणि दिल्लीकरांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे कारागिरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. 31 मार्च रोजी या महोत्सवाचा समारोप असून याच दिवशी गुढीपाडव्याचे औचित्य साधून कारागीर येथे मोठी गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण मराठमोळ्या पद्धतीने साजरा करणार आहेत.