नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दुष्काळावार गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत खासदारांनी लक्ष वेधून राज्याला विशेष पॅकेज देण्याची मागणी केली, तर सातत्याने तीन वर्षे मराठवाड्यातील दुष्काळ पाहता केंद्राने या भागासाठी तातडीने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी कॉँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी केली.
राज्यसभेत रजनीताई पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, शेतकरी
मोबाइलचे बिल भरू शकतो तर विजेचे का नाही, असे विधान करून खडसे यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शेतकर्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम केले आहे. लोकसभेत खासदार किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारने महाराष्ट्रात सिंचन घोटाळा केला नसता, तर राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली नसती, याकडे लक्ष वेधले.
मराठवाडा व विदर्भासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, दुष्काळाच्या पाहणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सदस्यांनी केली. केंद्रीय मंत्री अनंत गिते, भावना गवळी, कृपाल तुमाने, अरविंद सावंत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तिकर, डॉ. श्रीकांत शिंदे आदींनी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली.
खा. राजकुमार धूत यांचा रजनी पाटील यांच्या मुद्द्यांना पाठिंबा
खासदार राजकुमार धूत यांनी राज्यसभेत दुष्काळावर बोलताना राज्यातील विभागनिहाय दुष्काळग्रस्त गावांची आकडेवारी विशद केली. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, जनावर्यांच्या चार्याचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करून खासदार पाटील यांनी राज्यातील दुष्काळाविषयी मांडलेल्या मुद्द्यांना पाठिंबा दर्शवला. मराठवाडा, विदर्भात आतापर्यंत दुष्काळ जाहीर करणे गरजेचे हाते, परंतु अद्याप ही घोषणा करण्यात आली नसल्याचे धूत म्हणाले. दुष्काळ निवारणार्थ राज्याला भरीव निधी देण्याच्या दृष्टीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.