आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांत महाराष्ट्रात काविळीचे 23 हजार रुग्ण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्रात 2010 ते जानेवारी 2014 या चार वर्षांत काविळीचे एकूण 22 हजार 880 रुग्ण आढळून आले आहेत. भारतात या आजाराचे एकूण 3 लाख 94 हजार 509 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात त्यापैकी 5.79 टक्के रुग्ण आहेत. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत उपचारासाठी राज्याला 53 कोटी 73 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.


हिपॅटायटिस रुग्णांच्या उपचारासाठी आणि या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना एकूण 765 कोटी 73 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी महाराष्ट्राला 6.99 टक्के निधी प्रदान करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नानंतरही महाराष्ट्रात 2010 मध्ये हिपॅटायटिसचे 3 हजार 446 रुग्ण होते. 2011 मध्ये ही संख्या वाढून 5 हजार 994 झाली, 2010 मध्ये ती 6 हजार 175 झाली आणि 2013 मध्ये आतापर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार नव्या रुग्णांची संख्या 5 हजार 265 इतकी आहे. मात्र, ही आकडेवारी अंतिम नाही.
लक्षद्वीपमध्ये हिपॅटायटिस रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी असून गेल्या चार वर्षांत तिथे केवळ 57 रुग्ण आढळून आले आहेत. आंध्र प्रदेशात मात्र हिपॅटायटिस आजाराचे सर्वाधिक रुग्ण असून गेल्या चार वर्षांतील त्यांची संख्या 33 हजार 714 इतकी आहे.


हिपॅटायटिसचे संक्रमण रोखण्यासाठी योजण्यात आलेल्या उपाययोजनांतर्गत डिस्पोझेबल सिरींजचा उपयोग करणे, सर्व रक्तपेढय़ांना रक्ताचे नमुने तपासणे अनिवार्य करणे इत्यादी उपाय योजण्यात येत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे संचालित राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राद्वारे दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी राज्य सरकारांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. रोगांच्या तपासणीकरिता सहकार्यही केले जाते. काविळचीलस राज्यांना पुरवण्याआधी त्याची गुणवत्ता तपासली जाते, असेही गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले.


दूषित पाण्यामुळे कावीळ
काविळीचे मुख्य कारण दूषित पाणी हे असल्यामुळे भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण योजनेअंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली.