नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गेल्या अनेक वर्षांपासून साजर्या होणार्या गणेशोत्सवावर यंदा अनिश्चततेचे सावट पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले निवासी आयुक्त बिपिन मलिक यांनी गणेशोत्सव समितीच बरखास्त केल्याने गणेशोत्सवावर विघ्न पडले आहे. सदनातील अधिकार्यांच्या पुढाकाराने आयोजित समिती हा उत्सव साजरा करायची. पण समितीच्या अध्यक्षांची बदली झाल्याने मलिक यांच्या धाकामुळे उर्वरीत समितीच बरखास्त करण्यात आली आहे.
चार लाख मराठी लोकसंख्या असलेल्या दिल्लीमध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिल्लीमध्ये 47 गणेश मंडळे आहेत.तसेच महाराष्ट्र सदनात साजर्या होणार्या गणेशोत्सवाकडे दिल्लीकरांचे लक्ष असते. गेल्यावर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा लाख रुपये येथील समितीला दिले होते. या उत्सवाच्या निमित्ताने मराठी लोकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे असते. गेल्यावर्षी समितीतील अन्य कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांनी धाकामुळे अनेक कार्यक्रम रद्द केले. तेव्हा ही समिती केवळ 4 लाख 87 हजार रुपयेच खर्च करू शकली.
समितीच्या तत्कालिन अध्यक्षा नंदिनी आवळे यांची पुण्याला बदली झाल्याने 27 जून रोजी समितीच्या पदाधिकार्याची बैठक घेण्यात आली. त्यात यावर्षीच्या उत्सवाचा विषय निघाला परंतु निवासी आयुक्ताच्या धाकामुळे समितीच बरखास्त करण्यात आली. कोणीही अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. जुने महाराष्ट्र सदन गेले आठ महिने बंद आहे. केवळ आयुक्तालय तिथे आहे. नवीन महाराष्ट्र सदनात मोठे सभागृह आहे याठिकाणी ग्रंथोत्सव किंवा मराठी कार्यक्रमासाठी आयुक्त परवानगी नाकारतात तिथे उत्सव ही बाब दूरच राहिली. आधीच महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या रडारवर असलेले बिपीन मलिक यांना त्यांच्या काही सहकारी अधिकार्यांनी किमान गणेश उत्सवात अडथळे आणू अशी विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.
विसर्जन कोणाचे करायचे तेही ठरवू...
गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी समिती असो वा नसो महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी यावर्षी नवीन महाराष्ट्र सदनात गणेश उत्सव साजरा करू अशी भूमिका घेतली आहे. त्यात भाजप आणि शिवसेना अग्रेसर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची परंपरा यापुढे नवीन महाराष्ट्र सदनात सुरू राहील. त्यासाठी कोणत्याही अधिकार्याच्या परवानगीची आम्ही वाट पाहणार नाही आणि विसर्जन कोणाचे करायचे तेही आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया दिली.
गणेशोत्सव होणारच
महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. पण, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यास त्यावर विचार होईल व गणेशोत्सव साजरा झाल्यास महाराष्ट्र सरकार मदत करील. सदनात गणेशोत्सव साजरा होणार नाही, ही अफवा आहे. त्याची चौकशी करण्यात येईल. - पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री ( पत्रकार परिषदेत)