आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र सदनात तोतया भाजप नेत्याचा धुमाकूळ, बनावट व्हिजिटिंग कार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंचतारांकितअसलेल्या नवीन महाराष्ट्र सदनातील लॉबी आणि उपाहारगृहाचा उपयोग तीन महिन्यांपासून भाजपचे नेते असल्याचे सांगणारे एक जोडपे त्यांच्या ‘खासगी आणि संशयास्पद’ व्यवसायासाठी करत आहेत. निवासी आयुक्त बिपिन मलिक यांच्या नजरेत ही बाब येताच त्यांनी या जोडप्यास सदनात येण्यास मज्जाव केला असून त्यांचे उपद्व्याप सीसीटीव्ही फुटेजमधून तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू यांनी या नेत्याचा तपास करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रशस्त लॉबीमध्ये अनेक सोफासेट आहेत. संपूर्ण लॉबी वातानुकूिलत आणि दिव्यांचा लखलखाट यामुळे लॉबीमध्ये प्रवेश करताच पंचतारांकित हॉटेलचा आनंद मिळतो. याला लागूनच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी उपाहारगृह आहे. सध्या ते सर्वांसाठीच खुले आहे. तीन महिन्यांपासून भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य असल्याचे सांगणारे घनश्याम मिश्रा आणि त्यांच्यासमवेत कृष्णा नावाची महिला लॉबीत किंवा उपाहारगृहात बसलेले आढळतात. हे दोघेही आल्यानंतर अनेक तरुण मुली आणि काही पुरुषांसोबत टप्प्याटप्प्याने त्यांना भेटायला येतात उपाहारगृहातील एका कर्मचाऱ्याने मिश्रा कृष्णा हिला हटकले तेव्हा हे दोघेही त्यांना मारायला उठले. या जोडप्याला भेटायला येणाऱ्या तरुणींच्या हावभावावरून संशय निर्माण होत असल्याचे महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

काही पत्रकारांनी घनश्याम मिश्रा यांच्याशी परिचय केला तेव्हा त्यांनी स्वत:चे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य असल्याचे व्हिजिटिंग कार्ड दिले. परंतु हे कार्ड बनावट असल्याचे जाजू यांनी सांगितले. त्या कार्डवर भाजपच्या मुख्यालयाचा पत्ता आणि कमळ आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी असे नाव लिहिण्याचे या नेत्याने टाळले आहे.