आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadan Issue At Delhi, News In Marathi

महाराष्ट्र सदनात मराठी नेत्यांसोबतच भेदभाव; सत्यपाल सिंह यांना मंत्र्यांचा कक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंचतारांकित महाराष्ट्र सदनात येथील निवासी आयुक्त बिपिन मलिक हे मराठी लोकप्रतिनिधींना ठेंगा दाखवतात, तर परप्रांतातील खासदार व सनदी अधिकर्‍यांची चांगली बडदास्त ठेवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातत्याने मराठी व्यक्तींचा द्वेष करण्याचा ठपका असलेल्या आयुक्तांनी राज्यातील मंत्र्यांनाही झटका दिला आहे.

राज्य सरकारचा जराही धाक नसल्याने निवासी आयुक्तांनी येथील नियम धाब्यावर बसवले आहेत. खासदारांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना महाराष्ट्र सदनातील कक्ष मिळणे अपेक्षित आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी व सर्वसाधारण अशी वर्गवारी या सदनात केली आहे. त्यानुसार कक्षांमध्ये सुविधा आहेत. राज्यातील खासदार संसदेचे अधिवेशन असल्याने सदनात थांबले आहेत. त्यातील बहुतेक खासदारांना साधारण कक्ष देण्यात आले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातून निवडून आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांना निवासी आयुक्त बिपिन मलिक यांनी फोन करून महाराष्ट्र सदनात राहण्याचा आग्रह धरला. सिंह हे खासदार म्हणून निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात कुटुंबासह मुक्कामाला आहेत. विशेष म्हणजे त्यांना मंत्र्यांचा कक्ष उपलब्ध करून देण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच सिंह यांनीच
महाराष्ट्रातील सनदी अधिकारी माझ्यावर किती प्रेम करतात हे सांगताना हा किस्सा ऐकवला.

मला आग्रह करून मलिक यांनी येथे निवासासाठी बोलावून घेतले, असे सांगितले. सिंह यांचा कक्ष क्रमांक 104 आहे, तर 103 क्रमांकाचा कक्ष माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना 255 क्रमांकाचा सर्वसाधारण कक्ष देण्यात आला आहे. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनाही सर्वसाधारण कक्ष देण्यात आला होता. काही दिवस ते तिथे निमुटपणे राहिले, परंतु निवासी आयुक्त राजकारण करीत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरले तेव्हा त्यांना कक्ष बदलून देण्यात आला.

नितीन राऊतांना रोखले
निवासी आयुक्त हे एवढ्यावरच थांबत नाहीत तर 30 मे रोजी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्र सदनामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी अद्ययावत कक्ष बांधण्यात आला आहे. मात्र, ऐनवेळेवर आयुक्त मलिक यांनी त्यांना तिथे पत्रकार परिषद घेऊ दिली नाही. शेवटी राऊत यांना अन्य एका रिकाम्या खोलीत पत्रपरिषद घ्यावी लागली. मात्र, मंत्र्यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. काही महिन्यांपूर्वी माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांना कोणतेही भाडे न आकारता पत्रकार परिषदेचा कक्ष उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, त्याच दिवशी एक तासानंतर आमदार विनायक मेटे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्याचे त्यांना 15 हजार रुपये मोजावे लागले.

यासंदर्भात बिपिन मलिक यांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा ते म्हणाले की, उत्तम खोब्रागडेंचा विषय हा देशाच्या अस्मितेचा आहे. त्यावर मेटे यांचे उत्तर होते, मी राज्यातील 40 टक्के मराठा जनतेला आरक्षण मिळावे यासाठी लढतो आहे. तो माझा व्यक्तिगत स्वार्थ आहे काय? सत्यपाल सिंह यांना सदनातील कक्ष कसा उपलब्ध करून देण्यात आला? याबाबत सदनाचे व्यवस्थापक ममदापूरकर यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, सिंह यांना कक्ष द्यावा म्हणून लोकसभेकडूनच कळवण्यात आले होते. त्यांना मंत्र्यांचा कक्ष आणि राज्यातील खासदारांना सामान्य कक्ष हा भेदभाव कसा? यावर त्यांचे उत्तर होते, आम्ही उपलब्धतेनुसार कक्ष देतो.