आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्र सदनात दारुची रेलचेल, चौकशी सुरु; खवळलेले अधिकारी लागले खासदारांच्या मागे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्‍ट्र सदनातील गैरप्रकारामुळे आयुक्तांना धारेवर धरलेल्या खासदारांनाच आडवे करण्याचा डाव आता वरिष्ठ सनदी अधिका-यांनी रचला असून खासदारांकडून या सदनात दारुची रेलचेल असल्याची माहिती निवासी आयुक्तालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविली आहे. सदनात राहणारे बहुतांश खासदार हे शिवसेना आणि भाजपचे असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याचे राजकारण करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येते.
कोणत्याही शासकीय कार्यालयात, अतिथीगृहात मद्यपान करण्यावर बंदी असली तरी प्रत्येक ठिकाणी यबाबी बिनधास्त चालत असतात. लोकसभेच्या निवडणुकानंतर दिल्लीत आलेल्या नवनियुक्त खासदारांना घरांचा ताबा मिळायचा आहे. जे खासदार पहिल्यांदाच निवडूण आले आहेत त्यांना नवीन महाराष्‍ट्र सदनातील प्रत्येकी दोन कक्ष देण्यात आले आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून हे खासदार येथे निवासास आहे. खासदारांसोबत दिल्ली पाहण्यासाठी येणारे त्यांचे हौसे-गवसे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सदनात निवासासाठी असतात. येथील जेवणाची सोय व्यवस्थीत नसल्याने बाहेरुन जेवण मागविणे आणि सोबत मद्यही आणणे हे प्रकार मोठया प्रमाणात आहेत. महाराष्‍ट्र सदनामध्ये सर्वत्र कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. तर प्रत्येक कक्षाच्या दारापुढेही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कक्षाच्या आत काय चालले हे कळत नसले तरी येणारे-जाणारे आणि हालचाली कॅमेराबंद होतात.
शिवसेनेच्या खासदारांनी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना उत्तम जेवण, चांगले कक्ष आणि चांगली सेवा यासाठी दम दिला होता. तर उपहार गृहात जो गोंधळ घातला ती बाब मलिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ज्याला पोळीचा तुकडा भरविण्याचा प्रयत्न झाला तो मुसलमान असल्याचे उघडकिस आला त्याचे श्रेय मलिकांनाच जाते असे शिवसेनेच्या खासदारांचे म्हणणे आहे. मात्र, मलिकांकडून मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांना खासदारांकडून अनेक निंदणीय प्रकार होत असल्याची माहिती पुरविण्यात आल्याचे सुत्राने सांगितले. सदनामध्ये कोणतेही सामान आणताना अद्ययावत असलेल्या गोदरेज कंपनीच्या स्कॅनरमधून ते तपासल्या जाते आणि त्याचे चित्र 50 दिवस जतन होते. सुरक्षा कर्मचा-यांना हे सगळे दिसत असले किंवा मेटल डिटेक्टरव्दारे त्याच्या लक्षात येत असले तरी तो अधिका-यांकडे त्यावेळी तक्रार करण्याचे टाळतो. खासदारांशी खाजवायचे कशाला हा त्याचा उद्देश असतो. येथील अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार या सामानात दारू असेल तर स्क्रिनवर लाल रंग येतो आणि त्याचे चित्र आपोआप साठविल्या जाते.
महाराष्‍ट्र सदनातील एका यंत्रणेकडे अशा साहित्याची सुक्ष्म माहिती नोंदवून ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पुढे चौकशीदरम्यान अतिथींनी किंवा खासदारांनी कितीही पळवाट काढण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यातून सुटता येणार नाही.
मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार गेल्या महिनाभरातील माहिती यानिमित्ताने गोळा करण्यात आली आहे. जवळपास 300 चित्रफीती आक्षेपार्ह असल्याची सुत्राची माहिती आहे. ही सर्व चित्रे आणि माहिती सहारिया यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. महाराष्‍ट्र सदनामध्ये शिस्त असावी हा यामागील एक भाग असला तरी खासदारांकडून अपमानास्पद वागणूक मिळते म्हणून संतत्प अधिका-यांनी खासदारांना धडा शिकविण्यासाठी आखलेली ही योजना असल्याचेही एका अधिका-याने सांगितले. या प्रकरणी चौकशीनंतर खासदारांवर कारवाई करण्यासाठी सहारिया मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे परवानगी मागणार असल्याचेही सांगण्यात आले.