आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadan Proud To Nation Comment Bye Indian President Pranv Mukhergee

नवे महाराष्ट्र सदन हा देशाचा ठेवा - राष्ट्रपती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेली नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तू ही एवढी सर्वांगसुंदर आहे की, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचाच तो एक अनमोल ठेवा बनला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. राजधानी दिल्लीत नव्याने उभारण्यात आलेल्या या भव्य नूतन वास्तुचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ झाल्यापासूनच राज्यात तो या ना त्या कारणाने चर्चेत होता. वाद-प्रवादांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे उद्घाटन होऊ नये, असे डावपेचही राजकीय गोटात आखले गेले. मात्र, अखेर राष्ट्रपतींच्याच हस्ते या सदनाचे उद्घाटन झाले आणि दस्तुरखुद्द राष्ट्रपतींसह उपस्थित सर्वच मान्यवरांनी वास्तू उभारणीची आणि ती त्यासाठी घेणाºया भुजबळ यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. साहित्य, संस्कृती या संदर्भात महाराष्ट्र आणि बंगाल मधील साम्यस्थळांचा उल्लेख करुन उभय राज्यांतील सांस्कृतीक देवाण-घेवाणीला आता अधिकच चालना मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर हे सदन म्हणजे संपूर्ण देशाचा ठेवा असल्याचेही नमूद केले. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचे दाखले देत या सदनाच्या उभारणीचे महत्त्व अधोरेखीत केले. पेशव्यांनी उत्तरेत मोठीच मजल मारली, परंतु दिल्ली काबीज केली नाही. मात्र, या प्रकल्पामुळे आता दिल्लीत महाराष्ट्राचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही असे सांगत भुजबळांची दृष्टी आणि परिश्रमामुळेच प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे ते म्हणाले. भगवान के घर देर है, अंधेर नहीं, असा टोला लगावतानाच भुजबळ यांनी या वैविध्यपूर्ण वास्तूच्या उभारणीमागची संकल्पना स्पष्ट केली.

राजेशाही महाराष्ट्र सदन
० राज्यपाल व मुख्यमंत्री दालन - प्रत्येकी 13 कक्ष
० कॅबिनेट मंत्र्यांसाठी - 3 कक्ष व 8 दालने
० राज्यमंत्र्यांसाठी - 2 कक्ष व 16 दालने, आमदारांसाठी - 21 कक्ष
० अधिकारी व मान्यवरांसाठी - 80 कक्ष, एकूण कक्ष - 138
० सुसज्ज ग्रंथालय, 500 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, 100 आसन क्षमतेचा पत्रकार कक्ष, खासदार कक्ष, महाराष्ट्रातील बचत गट व विविध संस्थांच्या उत्पादन विक्रीसाठी दालन.

6.18 एकर नवीन महाराष्ट्र सदनाचा एकूण परिसर

आवारात महापुरुषांचे पुतळे
छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि यशवंतराव चव्हाण.