नवी दिल्ली - महाराष्ट्रातविधानसभेतील कॉँग्रेसच्या छाननी समितीची तिसरी बैठक सोमवारी रात्री उशिरापर्यंत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पार पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत काही मतदारसंघांची अदलाबदल आणि कॉँग्रेसच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सायंकाळी पासून रात्री १० पर्यंत चाललेल्या या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी आणि कॉँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नारायण राणे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात विधानसभेच्या काही मतदारसंघांत उमेदवारीबाबत वाद सुरू आहेत. त्याचा निवाडा कसा करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही मतदारसंघ बदलूून मागितले आहेत त्याबाबत या नेत्यांनी विचारविमर्श केला. काही विद्यमान उमेदवारांना बदलण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.