आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Congress News In Marathi

काँग्रेसची २८८ ची तयारी, अंतिम निर्णय सोनियांचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत आघाडीतील निम्म्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही ताठर भूमिका घेत असल्याने काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. मंगळवारी काँग्रेसच्या छाननी समितीने दिल्लीत राज्यातील सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघांची चाचपणी पूर्ण केली असून त्याची यादी बुधवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली जाणार आहे. उमेदवारांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षाच घेणार आहेत.
मल्लिकार्जुन खारगे यांच्या निवासस्थानी मागील दोन दिवस छाननी समितीच्या मॅरेथान बैठका झाल्या. या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, नारायण राणे उपस्थित होते. राष्ट्रवादीसोबत अद्याप वाटाघाटी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांनी स्वबळाचा हेका कायम ठेवल्यास आपलीही वेळेवर धावाधाव होऊ नये म्हणून काँग्रेसने २८८ मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. छाननी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या वाट्याच्या १७४ जागांसाठीची अंतिम यादी सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ११४ जागांवरही काँग्रेसने तयारी केली आहे, मात्र त्याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्षाच घेतील, याच आठवड्यात याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी टिली. काही मतदारसंघांचे बदल आघाडीतील दोन्ही पक्षांना अत्यावश्यक असून त्यावरही छाननी समितीमध्ये चर्चा करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीमुळे उत्साह!
उत्तर प्रदेश, राजस्थानातील पोटनिवडणुकीच्या निकालाने कॉँग्रेसच्या नेत्यांमध्ये उत्साह दिसून आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ‘महाराष्ट्रात पुन्हा आम्हीच सत्तेवर येऊ’ असे भाकीत केले. पोटनिवडणुकीतील भाजपविरोधी निकालाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट असून विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील. आम्ही मतभेत विसरून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींची हवा ओसरली : माणिकराव
मोदी आणि भाजपची हवा अवघ्या शंभर दिवसांतच ओसरली. लोक त्यांच्या आश्वासनाला भाळले होते. महाराष्ट्रातही भाजपची अवस्था आजच्या निकालासारखीच होणार आहे. भाजपने आपली फसवणूक केली होती, हे लक्षात आल्याने लोकांनी भाजपला चार हात दूर ठेवले. राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडीचा निर्णय केंद्रातील नेते घेणार आहेत. आघाडी व्हावी अशी माझी इच्छा आहे. सत्ता काबीज करण्यासाठी आम्ही आपसातील मतभेद विसरू, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.