आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील भाविक सुखरूप असून मदतकार्यास वेग - पृथ्‍वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली ; उत्तराखंडात मदत व बचावकार्याला वेग आला असून महाराष्‍ट्रातील जवळपास 49 अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी मदत करीत आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी महाराष्‍ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


आपण गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, महाराष्‍ट्रातून 2949 भाविक उत्तराखंडला गेले असून त्यातील जवळपास 2200 भाविकांना आपापल्या गावी परत पाठवण्यात राज्याच्या यंत्रणेला यश आले आहे. बद्रीनाथला देशातील जवळपास चार हजार भाविक अडकून आहेत. त्यात राज्यातील चारशे ते साडेचारशे भाविक आहेत. त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. त्यांना तेथून बाहेर


हलवण्याचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी महाराष्‍ट्र सरकारचे एक हेलिकॉप्टर मदत करत आहे. टोकन पद्धतीने व आवश्यकतेनुसार भाविकांना तेथून हलवण्यात येत यावे, अशी सूचना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना केली असता त्यांनी तातडीने अंमलबजावणी केली.


उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सध्या मदत व बचावकार्याला वेग आल्याचे ते म्हणाले. महाराष्‍ट्र सरकारने उत्तराखंडसाठी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातील एक कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल. डेहराडून येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भाविकांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. नंतर हरिद्वारला जाऊन तेथील मदतकार्याचा आढावा घेतला. तेथील वेगवेगळ्या दोन गटांच्या भाविकांशी रेल्वे स्थानकावर भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या. डेहराडून येथे खासदार चंद्रकांत खैरे, राजू शेट्टी, आमदार सुरेश जेथलीया यांची भेट झाली. त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली. 150 भाविकांशी अजूनही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.


महाराष्‍ट्र सदनातून 487 लोकांना मदत
महाराष्‍ट्र सदनात उघडण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून 24 जून पर्यंत 487 लोकांना आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. 260 लोकांना आतापर्यंत रेल्वेने आपआपल्या गावी पाठविण्यात आले आहे. आणखी शंभर भाविकांची याठिकाणी येण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी सदनामार्फत सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला. रेल्वेमंत्र्याच्या सहकार्यामुळे रेल्वे आरक्षणाचा मार्ग सुकर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.