आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra's Five With 25 Children Awarded Balveer

महाराष्ट्राच्या पाच जणांसह 25 बालकांना बालवीर पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जळत्या स्कूल बसमधून दोन बालकांचे प्राण वाचवणार्‍या महाराष्ट्राच्या शुभम चौधरीसह देशातील 25 बालकांना त्यांच्या पराक्रमासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कारप्राप्त बालकांत उत्तर-पश्चिम भागातील 8, महाराष्ट्राचे 5, दक्षिण भारतातील 4, उत्तर प्रदेशचे 2, तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेशच्या प्रत्येकी एका बालकांचा समावेश आहे. 24 जानेवारीला पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते त्यांचा विशेष समारंभात गौरव केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावेळी खुल्या जीपमधून राजपथावरून फेरी मारण्यात येईल.

केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयावेळी आपल्या लहान भावाचे प्राण वाचवणार्‍या 8 वर्षीय महिका गुप्ता हिला बालवीरतेचा सर्वोच्च ‘भारत पुरस्कार’ देऊन गौरव केला जाईल, तर महाराष्ट्राच्या शुभम संतोष चौधरीसह राजस्थानच्या मलायकासिंह टाक हिला प्रतिष्ठित गीता चोपडा पुरस्कार प्रदान केला जाईल. तिने चार अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पेन चाकूचा धाक दाखवत आपली सुटका करून घेतली होती. महाराष्ट्राच्या संजय नवसू सुतार व अक्षय जयराम रोज यांच्यासह उत्तर प्रदेशच्या मौसमी कश्यप व आर्यन राज शुक्ल यांना वीर बापू गायधनी पुरस्काराने सन्मानित केले जाईल. महाराष्ट्राची साडेसातवर्षीय तन्वी नंदकुमार ओव्हाल ही यंदा सर्वात कमी वयाची बालवीर ठरली आहे. याशिवाय दिल्लीचा सागर कश्यप, हिमाचल प्रदेशची शिल्पा शर्मा, मध्य प्रदेशचा सौरभ चंदेल आणि छत्तीसगडचा अभिषेक इक्का यांनाही शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. दिल्लीच्या सागर कश्यपने आग्रा येथील कालव्यात बुडत असलेल्या चार बालकांपैकी तिघांचे प्राण वाचवले होते. हिमाचल प्रदेशची 14 वर्षीय बालवीर शिल्पा शर्मा हिने बिबट्याच्या तावडीतून आपल्या लहान भावाची सुटका केली होती. मध्य प्रदेशच्या सौरभ चंदेलने तलावात बुडत असलेल्या दोन बालकांचे प्राण वाचवले होते, तर छत्तीसगडच्या अभिषेक इक्काने 26 फूट खोल विहिरीतील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मित्राचे प्राण वाचवले होते.
शौर्य पुरस्कारार्थींना विशेष आरक्षण
पुरस्कारप्राप्त बालकांना पदक, प्रमाणपत्र आणि आर्थिक मदत दिली जाते. त्याबरोबरच शालेय शिक्षणासाठी आणि इंजिनिअरिंग, एमबीबीएस, पदविका किंवा अन्य पदवी मिळवायची असेल तर त्यासाठीही आर्थिक मदत मिळते. देशातील सर्व महाविद्यालयांमध्ये त्यांच्यासाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगची जागा राखीव ठेवलेली असते.