आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maid Found Dead At BSP MP's Residence, Wife Detained

मोलकरणीचा बेदम मारहाणीत मृत्‍यू, बसपच्‍या खासदाराची पत्‍नी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायावतींच्‍या बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशमधील खासदार धनंजय सिंह यांची पत्नी जागृती यांना मोलकरणीची निर्दयीपणे मारहाण करुन हत्‍या केल्‍याच्‍या आरोपात अटक करण्‍यात आली आहे. जागृती यांनी राखी नावाची मोलकरीण ठेवली होती. तिला त्‍यांनी बेदम मारहाण केल्‍याचे घरातील एका नोकराने सांगितले. राखीचा मृत्‍यू या मारहाणीमुळेच झाल्‍याचे नोकराचे म्‍हणणे आहे. राखी ही मुळची बिहारमधील रहिवासी होती. अद्याप तिच्‍या कुटुंबापैकी कोणीही पोहोचलेला नाही. त्‍यामुळे शवविच्‍छेदन करण्‍यात आलेले नाही.

हा प्रकार दिल्‍लीत घडला आहे. धनंजय सिंह हे जौनपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. धनंजय सिंह यांना दिल्लीतील साऊथ अव्हेन्यू येथे दोन घरे देण्यात आली आहेत. यातील एका घरात त्यांची पत्नी जागृती राहत होत्या. या घरात जागृती यांनी राखी नावाच्‍या मोलकरणीला घरकामासाठी ठेवले होते.

धनंजय सिंह मंगळवारी सकाळी दिल्‍लीत दाखल झाले.माध्‍यमांनी घटनेबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले, की घरात काम करणारी एक मोलकरीण खाली पडली आणि तिचा मृत्‍यू झाला, एवढीच माहिती पत्‍नीने दिली आहे. ही मोलकरणी सुमारे 10 महिन्‍यांपासून कामावर होती, असे सिंह यांनी सांगितले.

घरातील एका नोकराने मात्र वेगळीच माहिती दिली. जागृती क्षुल्लक कारणावरुन राखीला बेदम मारहाण करायच्या. दोन दिवसांपूर्वीदेखील त्यांनी राखीला मारहाण केली व यात तिचा मृत्यू झाला, असे त्‍याने सांगितले. घरातील इतर नोकरांनीही जबाबात ही माहिती दिली होती. त्‍यानंतरच जागृती यांना अटक करण्‍यात आली. परंतु, पोलिस त्‍यांची चौकशी करत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. जागृती सध्‍या निवासस्‍थानीच असून पोलिसांनी पुरावे गोळा करण्‍यात येत असल्‍याचे सांगितले.

धनंजय सिंह यांच्‍या पहिल्‍या पत्‍नीचा मृत्‍यू लखनऊ येथील गोमती नगर येथील निवासस्‍थानी झाला आहे. याप्रकरणीही अनेक प्रश्‍न उपस्थित करण्‍यात आले होते. जौनपूर येथेही एका नोकराचा संशयास्‍पद मृत्‍यू झाला होता. मात्र, कोणत्‍याही प्रकरणी धनंजय यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झालेला नव्‍हता.