आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक इन इंडिया बुलेट ट्रेन’ची निर्मिती गुजरातेत, 14 सप्टेंबर रोजी साबरमतीत होणार शिलान्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे याच महिन्यात उद््घाटन होणार आहे. अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनची कोनशिला १४ सप्टेंबर रोजी गुजरातमधील साबरमती येथे बसवली जाईल. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जपानचे पंतप्रधान शिंजो आबे प्रामुख्याने उपस्थित असतील. १३ सप्टेंबर रोजीच आबे अहमदाबादेत पोहोचतील. 

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त १५ आॅगस्ट २०२२ रोजी ही बुलेट ट्रेन प्रत्यक्षात सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. दरम्यान, “मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत या रेल्वेची निर्मिती गुजरातमध्येच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवनियुक्त रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात आदेश दिला असून गुजरातेत निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या रेल्वेचे काही भाग येथे तयार केले जातील. त्यानंतर २०२५ ते २०२७ या काळात संपूर्ण रेल्वेची बनावटच गुजरातेत करण्यासाठी जपानशी चर्चा सुरू आहे. जपानकडून बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान घेण्याची तयारीही सरकार करत आहे.  

१० अधिकाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
बुलेट ट्रेन प्राधिकरणात सुमारे दोन डझन अधिकारी असून त्यापैकी १० जणांचे जपानमध्ये प्रशिक्षण पार पडले आहे. ऑक्टोबरमध्ये आणखी १० अधिकारी प्रशिक्षण घेतील. २०२२ मध्ये बुलेट ट्रेन प्रत्यक्षात धावेपर्यंत बुलेट ट्रेन प्राधिकरण, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३०० पेक्षा अधिक होईल. या सर्वांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे २००० कर्मचारी प्रशिक्षण घेतील.  त्यापैकी निम्म्यांना प्रशिक्षणासाठी जपानला पाठवले जाईल, तर उर्वरित अधिकाऱ्यांना वडोदरामध्ये जपानच्या सहकार्याने बनवलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाईल. चालकांना ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तर, वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना ३ ते ५ महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल. भारतात प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी जपान बुलेट ट्रेन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने एक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला जात आहे.

२०२२ पर्यंत २४ बुलेट ट्रेन  
२०२२ पर्यंत भारतात पहिल्या टप्प्यात जपानकडून २४ बुलेट ट्रेन आणल्या जातील. यांची किंमत सुमारे ४५०० ते ५००० कोटी रुपये असेल. पुढच्या टप्प्यात या रेल्वेंची संख्या ३६ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आगामी काळात भारतातच बुलेट ट्रेनची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे सरकारने ठरवले आहे. यामुळे आर्थिक बचतीसोबतच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. यासाठी गुजरातला प्रथम प्राधान्य देण्यात आले असून महाराष्ट्रातही काही भागांच्या निर्मितीचा विचार सुरू आहे.  
बातम्या आणखी आहेत...