नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘मेक इन इंडिया’ अभियानाचा २५ सप्टेंबरला प्रारंभ होत आहे. दिल्लीत विज्ञान भवनात मुख्य समारंभ होत असून अनेक राज्यांच्या राजधान्यांसह ३३ देशांत या अभियानाची याच दिवशी सुरुवात होईल.
उत्पादन व निर्मिती क्षेत्रात भारत जागतिक केंद्र ठरावे तसेच रोजगार व अर्थव्यवस्थेला बळकटी येण्याच्या दृष्टीने सरकारचे हे पाऊल आहे.
पंतप्रधान कार्यालयाने परदेशी गुंतवणुकीसाठी उद्योग व व्यापाराशी संबंधित सुमारे २५ क्षेत्रांना मंजुरी दिली असून मोदींनीही यासंबंधीचे सादरीकरण तीनदा पाहिले आहे.
व्यापक अभियान : हे अभियान अत्यंत व्यापक असावे, अशा मोदींच्या सूचना आहेत. आघाडीच्या अर्थव्यवस्थाही गुंतवणुकीसाठी पुढे याव्यात हा यामागे उद्देश आहे. याची जबाबदारी उद्योग-वाणिज्य सचिव अमिताभ कांत यांच्यावर असून त्यांनी इनक्रेडबिल इंडिया व दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांत काम केले आहे. ऑटो
मोबाइल, वस्त्रोद्योग, ऑटो सुटे भाग, औषधी, फळ प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, रेल्वे, बंदर, पर्यटन व ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आहे.
गुंतवणूकदारांसाठी वेबसाइट सुरू होणार
२५ सप्टेंबरला मोदी एक वेबसाइट सुरू करतील. यामुळे भारतात गुंतवणूक करू इच्छिणा-या उद्योगांची सोय होईल. याबाबत सीआयआय, फिक्की, असोचेम या संघटनांनाही सूचित करण्यात आले आहे. यातून निर्यात वाढावी व विदेशी चलन वाढावे, जागतिक ब्रँड भारतात यावेत हा मोदींचा प्रमुख उद्देश आहे.
एक खिडकी योजना
सर्व मंत्रालयांनी
आपले कामकाज सुलभ करून गुंतवणूकदारांना आकर्षित करावे, केवळ एक ऑनलाइन फॉर्म भरून औपचारिकता पूर्ण करता येण्याच्या दृष्टीने कामकाजाचे स्वरूप निश्चित करावे, अशा सूचना आहेत.