नवी दिल्ली- महाराष्ट्रातील मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि प्रसाद श्रीकांत पुरोहितसह पाच जणांना सुप्रीम कोर्टाने आज (बुधवारी) मोठा दिलासा दिला. पाचही आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अँक्ट) कायद्याअंतर्गत कारवाई करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
तपास यंत्रणेने कोर्टात सादर केलेले पुरावे मोक्का कायद्यासाठी पुरेसे नाहीत. या पुराव्यांवरून सर्व आरोपींना दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायमूर्ती फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला आणि न्यायमूर्ती शिव कीर्ति सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे तसेच यापूर्वीच्या प्रकरणात समावेश असल्यामुळे आरोपी राकेश धवाडे याच्यावरील मोक्का कायद्याअंतर्गत आरोप कायम ठेवण्यात आले आहेत.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर, कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर धर द्विवेदी, अजय एकनाथ राहिकर व शिव नारायण गोपाल सिंह कलसंगरा यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत करण्यात आलेले आरोप रद्द केले. त्यामुळे सर्व आरोपींचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर एक महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ कोर्टाला दिले आहेत.