नवी दिल्ली - मद्यसम्राट विजय मल्ल्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांचे ९ हजार कोटी रुपये कर्ज थकवून ब्रिटनमध्ये परागंदा झालेल्या मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट शुक्रवारी चार आठवड्यांसाठी निलंबित केला. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ईडी मल्ल्यांविरुद्ध आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात मनी लाँडरिंगची चौकशी करत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने ईडीच्या विनंतीवरून मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित करण्याची कारवाई केली आहे. मल्ल्या तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांचा पासपोर्ट निलंबित करण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. ईडीने मल्ल्यांना चौकशीसाठी हजर राहाण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले होते. परंतु मल्ल्या तिन्हीवेळा (१८ मार्च, २ आणि ९ एप्रिल) ईडीसमोर हजर झाले नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, पासपोर्ट अधिनियम १९६७ च्या कलम १० अ अन्वये मल्ल्यांच्या डिप्लोमॅटिक पासपोर्टची वैधता चार आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. ‘त्यांचा पासपोर्ट रद्द का करण्यात येऊ नये? ’अशी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
पुढे वाचा... डिप्लोमॅटिक पासपोर्टचे महत्त्व, मल्ल्यांची बनवाबनवी, भास्कर Q & A मल्ल्यांचे काय होणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे