आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Banerjee Rally In Delhi Latest News In Marathi

ना लोक आले, ना हजारे; ममता म्हणाल्या, ही तर अण्णांची सभा होती, मी त्यांच्यासाठी आले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तृणमुल काँग्रेसची (टीएमसी) दिल्लीतील पहिली प्रचारसभा फ्लॉप ठरली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या सभेसाठी येणार होते, मात्र, ऐनवेळी त्यांनी दांडी मारली, तर सभेला गर्दी जमवण्यात नेते अपयशी ठरले त्यामुळे ते आले नसल्याची चर्चा आहे. 50 हजारांची क्षमता असलेल्या रामलिला मैदानावर फक्त शे-पाचशे लोक जमा झाले. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुलच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी तर अण्णांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते.
गर्दी कमी असली तरी, ममतांनी त्यांच्या अंदाजात विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एक सारखेच असून त्या दोघांनी मिळून देशाला विकायला काढले आहे.'
ममता म्हणाल्या, ' कोलकत्यातून प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र, मी कुठूनही सुरवात करु शकते. दिल्ली, पंजाब, बिहार सर्व माझीच राज्ये आहेत. त्या म्हणाल्या, 'सीपीएम, भाजप आणि काँग्रेस सर्वांनीच मला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, मी कोणाचाच पाठिंबा घेतलेला नाही.' यापुढे उत्तर प्रदेश आणि गुजरात येथेही सभा होईल, अशी घोषणा त्यांनी केली. त्या म्हणाल्या, 'मी जी लढाई सुरु केली आहे, ती सुरुच राहाणार आहे. मग कोणी साथ दिली किंवा नाही दिली त्याची पर्वा न करता हा लढा सुरुच राहिल.'
मी अण्णांच्या सभेसाठी आले होते
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'दिल्लीत अण्णा हजारेंची सभा होती. मी माझी सर्व कामे बाजूला टाकून त्यांना साथ देण्यासाठी आले होते.'
ममता म्हणाल्या, वर्किंग डे असल्यामुळे लोक आले नाही
ममतांच्या सभेसाठी गर्दी जमली नाही, त्याचे कारण स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, 'आज वर्किंग डे आहे. त्यामुळे लोक आले नाहीत.' भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, 'गुजरातच्या नेत्यांचा चेहरा जातियवादी आहे.' गुजरातच्या विकासावरही त्यांनी टीका केली.
अण्णांनी मारली दांडी
ज्येष्ट समाजसेवक अण्णा हजारे ममता बॅनर्जींच्या या सभेला गैरहजर राहिले. त्यांच्या सहकारी सुनीता गोदरा यांनी, अण्णांची तब्यत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नसल्याचे सांगितले. मात्र, रामलिला मैदानावर लाखोंची गर्दी पाहाण्याची सवय झालेल्या अण्णांना आजच्या सभेला गर्दी झाली नसल्याचे कळाल्यामुळे त्यांनी दांडी मारल्याचे बोलले जात आहे.