आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीच नसल्याने अण्णांची पाठ; ही माझी सभा नव्हती : ममता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याने निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भरभराट येईल, असे स्वप्न पाहणार्‍या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बुधवारी भ्रमनिरास झाला. रामलीलावर अण्णांच्या उपस्थितीत त्यांची सभा होती. मात्र, लोकांनी पाठ फिरविल्याने अण्णांनी ऐनवेळेवर तब्येतीचे कारण पुढे करून गैरहजेरी लावली. अण्णा न आल्याने चिडलेल्या ममतांनीही ‘माझी सभा नव्हती; अण्णांची होती’, असे सांगून अपयशाचा चेंडू अण्णांच्या कोर्टात टाकला. निवडणुकीच्या निमित्ताने अण्णा ममतांच्या व्यासपीठावरून भ्रष्टाचाराविरुद्ध बिगुल फुंकणार होते. मात्र, अण्णांना दोन वर्षांपूर्वीसारखीच गर्दी अपेक्षित होती. अण्णांच्या सभेला लोक येतीलच असे गृहीत धरून ममता गाफील राहिल्या. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. समोर 5 हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या. दुपारी 1 वाजता सभा होती, तर इकडे महाराष्ट्र सदनात खोली क्रमांक 130मध्ये मंगळवारीच अण्णा आले होते. दुपारी 12 वाजता पोलिस, पत्रकार मैदानावर जमले. दोन-चारशे लोक सोडले तर खुच्र्या रिकाम्या होत्या. अण्णांनी सुनीता गोदारांसह काही कार्यकर्ते सभास्थळी पाठवले. लोकच नसल्याने आजाराचे कारण पुढे करत त्यांनी जाणे टाळले.

अपमानास्पद वागणूक मिळालेल्या ममतांनी ही अण्णांची सभा होती, माझी नव्हती. कामे सोडून मी कोलकात्याहून त्यांच्या सभेसाठी आले, असे स्पष्टीकरण दिले. अण्णांची प्रतिक्रिया घेण्यासाठी मीडियाने महाराष्ट्र सदनात गर्दी केली. परंतु दिवसभर ते आराम करत असल्याचे कारण सांगण्यात आले. सुनीता गोदारा यांनी घशाचा त्रास होत असल्याने अण्णा सभेला गेले नसल्याचे सांगितले. याच वेळी माजी केंद्रीय मंत्री व तृणमुल कॉँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांनी अण्णांची भेट घेऊन नेमकी स्थिती जाणून घेतली. त्यानंतर जनरल व्ही. के. सिंगदेखील अण्णांना भेटून गेले.

आपमधून बाहेर पडलेले विनोदकुमार बिन्नी यांनी सकाळी अण्णांची भेट घेतली होती. या सभेत ममता अण्णांच्या उपस्थितीत बिन्नीच्या दिल्लीहून उमेदवारीची घोषणा करतील, अशीही रणनीती होती. सायंकाळी बिन्नी पुन्हा अण्णांना भेटायला आले, पण त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे नाराज बिन्नी अण्णांना रात्री भेटेन असे सांगत सदनातून बाहेर पडले.

एकीकडे सभेला लोकांनी पाठ फिरविल्याने दु:खी झालेल्या ममतांनी आज वर्किंग डे असल्याने लोक येऊ शकले नाहीत असा खुलासा केला.कोणी माझ्या सोबत असो वा नसो माझा लढा सुरू राहील, असेही त्यांनी अण्णांना उद्देशून म्हटले, तर नरेंद्र मोदी हे जातीयवादी असल्याची टिका त्यांनी केली.

सभेचे व्यवस्थापन कोणी करायचे याबाबत अण्णा टीम आणि तृणमुल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतांतरे दिसून आली. गोदारा म्हणाल्या, ममतांनी ही सभा सुटीच्या दिवशी सायंकाळच्यावेळी ठेवायला पाहिजे होती. तरच लोक येऊ शकले असते. तर अण्णांच्या सभेला गर्दी होतेच असे तृणमूलने गृहीत धरले होते, परंतु रॅलीचा चांगलाच फज्जा उडाला.