नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘मन की बात’ उपक्रमाबद्दल लोकांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी जनतेचा सल्ला मागितला आहे. जे लोक अजूनही इंटरनेट किंवा सोशल मीडियाबाबत अनभिज्ञ आहेत त्यांनी थेट पत्र पाठवून
आपल्या भावना कळवाव्यात, असे आवाहन मोदींनी केले.
आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी रविवारी काळ्या पैशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. परदेशातील काळ्या पैशाची पै-पै भारतात आणण्याचे अभिवचन त्यांनी दिले. नंतर संवादाच्या या उपक्रमाबद्दल जनतेने आपल्या भावना कळवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. आकाशवाणी, संसद मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर साध्या कागदावर लिहून भावना कळवा, असे ते म्हणाले. तुमचे प्रत्येक पत्र माझ्यापर्यंत पोहचेल, अशी हमी त्यांनी या वेळी दिली.
यासंबंधी येणा-या प्रत्येक पत्राची गंभीर दखल घेतली जाईल, असे सांगून लोक पत्र पाठवतात याचा अर्थ देशाशी संबंधित मुद्द्यांवर जनता जागरुक आहे हेच सिद्ध होते, असेही मोदींनी नमूद केले.
स्वच्छतेबाबत दबाव वाढेल
सर्व सरकारी कार्यालये व नगर परिषदा व महापालिकांना स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलावीच लागतील. यासाठी दबाव वाढणार आहे, असा इशारा मोदी यांनी दिला. सतना येथील भरत गुप्ता यांनी रेल्वेमध्ये डस्टबिन नसतात, अशी तक्रार ई-मेलमार्फत केली होती. लोकांनी यावर उपाय म्हणून एका कोप-यात हा कचरा गाेळा केला. सोशल मीडियातील एक उदाहरण त्यांनी दिले. एकाने आपल्या मुलाचे छायाचित्र अपलोड करून ‘आजचा माझा हीरो’ असा उल्लेख केला होता. हा मुलगा जेथे कचरा दिसेल तो उचलून टाकत होता.
कुठवर चुका लपवणार?
मी ज्या विषयात हात घालत आहे त्यात प्रथम सरकारच अडचणीत येऊ शकते याची मला जाण आहे. मात्र आपण या गोष्टी किती दिवस लपवणार आहोत. किती दिवस टाळाटाळ करणार. शुद्ध हेतूसाठी कधी कधी अडचणीही झेलाव्या लागतात, असे मोदी म्हणाले.
पुढील संवाद व्यसनाबाबत...
अभिषेक पारिख यांनी एक पत्र पाठवले होते. त्यांनी यात युवा पिढी व्यसनाधिन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: ड्रग्जच्या आहारी जाणा-या पिढीबाबत ही चिंता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर मी ‘मन की बात’ करताना यावर निश्चित चर्चा करेन, असे आश्वासन मोदींनी दिले.
मोदी म्हणाले...
खादीबाबत : मी गेल्या वेळी खादीची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले होते. खादीच्या कपड्यांची विक्री १२५ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
नशेखोरीबाबत : हा प्रश्न भारतात अत्यंत गंभीर बनत चालला आहे. यात ड्रग्जमाफियांचा हात आहे. त्यांच्यामुळेच युवा पिढी वाईट मार्गावर मार्गक्रमण करत आहे.
स्वच्छ भारतबाबत : या अभियानाचा लाभ गरिबांनाच होणार आहे. ज्यांच्या घरांभोवती व वस्त्यांमध्ये कचरा, घाण आहे ते श्रीमंत नव्हे गरीब लोक आहेत.
अपंग मुलांसाठी खास योजना
गेल्या वेळी एकाने अपंग मुलांबाबत पत्र पाठवले होते. यावर विचारणा केली तेव्हा कळाले की मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिका-यांनी यासाठी विशेष दोन योजना तयार केल्या आहेत. यात विशेष अपंगत्व असलेल्या एक हजार मुलांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रीय विद्यालय व विद्यापीठास प्रत्येकी १ लाख रुपये अनुदान दिले जाईल.