आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Sisodia\'s Sudden Visit To School, Principol Suspended

शिसोदियांकडून शाळेची \'आप\'स्टाइल पोलखोल, प्रिन्सिपॉल जागेवरच निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी बुधवारी राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनालगतच्या राजेंद्र प्रसाद उच्च माध्यमिक सर्वोदय विद्यालयाला अचानक भेट दिली. फूड प्रोसेसिंगचा अभ्यासक्रम चालवल्या जाणा-या या महाविद्यालयात बोगस बिले सादर करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. बनावट कर्मचारी दाखवणे, अन्न प्रक्रिया लॅब नसणे आदी गैरप्रकार लक्षात येताच शिसोदिया यांनी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपॉलला जागेवरच निलंबित केले. लाचलुचपत विभागाला एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच आणखी एका गेस्ट लेक्चररची सेवा समाप्त करत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. अडीच तासांच्या पाहणीत शिसोदिया यांनी बिले व कागदपत्रे तपासत अनेक त्रुटी शोधून काढत बोगस शाळा चव्हाट्यावर आणली.

शिसोदिया यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह या महाविद्यालयावर छापा टाकला. प्रेसिडेंट इस्टेट भागातील या उच्च माध्यमिक महाविद्यालयात दिल्लीतील विविध ठिकाणांहून चिकन व इतर किराणा वस्तू मागवण्यात येत होत्या. त्यांची बिले वेगवेगळी होती. एके ठिकाणी पाच किलोग्रॅम चिकन २१० रुपये किलोग्रॅम या दराने खरेदी करण्यात आले होते. त्याचे बिल १०५० रुपये असणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ८५० रुपये इतके लावले. स्कूलमध्ये स्टॉक रजिस्टरमध्ये खरेदी केलेल्या वस्तूंचा तपशील नव्हता तरीही लाखो रुपयांची बनावट बिले दाखवण्यात आली आहेत. प्रिन्सिपॉलच्या कपाटातून कोरे बिल बुक जप्त करण्यात आले. नोंदीत अनेक अनियमितता आढळून आल्या.

कॉलेजमध्ये लॅबच नाही
पाहणीत असे आढळून आले की, फूड प्रॉडक्शन लॅबच अस्तित्वात नव्हती. तरीही तेथे खाद्यपदार्थ शिकवण्याचे प्रॅक्टिकल्स घेण्यात अाल्याचे दाखवण्यात आले. त्यासाठी दरमहा हजारो रुपयांचा किराणा खरेदी केला गेला. याबाबत शिसोदियांनी वर्गात जाऊन थेट मुलांना विचारले, तर मुलांनी आतापर्यंत फक्त एकच प्रॅक्टिकल झाल्याचे सांगितले. शिसोदियांनी प्रिन्सिपॉल व गेस्ट लेक्चररला फूड प्रोसेसिंगबाबत प्रश्न विचारले. त्यांना त्याची उत्तरेच देता आली नाहीत.

वेतन पाचांचे, हजर एक
कारवाईत कागदपत्रांची तपासणी करताना महाविद्यालयात पाच शिपाई असल्याचे दाखवण्यात आले. त्यांच्या पगारापोटी दरमहा २८ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात केवळ एकच कर्मचारी सर्व कामे करत होता. त्यालाही पगाराच्या अर्धीच रक्कम दिली जात होती.

शिसोदियांचा पारा चढला
मुलांनी प्रॅक्टिकल झाले नसल्याचा खुलासा करताच शिसोदियांचा पारा चढला. त्यांनी प्रिन्सिपॉलकडे स्पष्टीकरण मागितले असता प्रिन्सिपल म्हणाले, विद्यार्थी कुणाचेच नसतात. ते तुमच्यासमोर तुमच्यासारखे, माझ्यासमोर माझ्यासारखे बोलतील. यावर भडकलेल्या शिसोदियांनी मुलांचे आयुष्य घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मुलांबाबत तुम्ही असा विचार करत असाल तर ते अतिशय लाजिरवाणे आहे. शिसोदियांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे व चौकशीचे आदेश दिले.
पुढील स्लाइड्वर पाहा PHOTO