आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे सत्यच, तिवारींच्या वक्तव्यावरून खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी २०१२ मध्ये लष्करी तुकडीने दिल्लीकडे कूच केल्याचा चार वर्षांपूर्वीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. त्या वेळी मनमोहन सिंग सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होता, हे वृत्त ‘दुर्दैवी पण सत्य’ होते, असे तिवारी म्हणाले, मात्र, तिवारींच्या या वक्तव्यावर कडक टीका होत आहे.

शनिवारी एका पुस्तक प्रकाशनात प्रश्नाच्या उत्तरात मनीष तिवारी म्हणाले, ‘त्या वेळी मी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीचा सदस्य होतो. ते वृत्त दुर्दैवी पण खरे होते. मी त्याबाबत युक्तिवाद करणार नाही. माझ्या माहितीनुसार हे वृत्त खरे होते, एवढेच मला म्हणायचे आहे.’ मनीष तिवारी यूपीए सरकारमध्ये ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ च्या दरम्यान माहिती व प्रसारण राज्यमंत्री होते. दरम्यान तिवारींच्या वक्तव्याने वादाला ताेंड फुटल्याचे लक्षात येताच काँग्रेसने या वृत्ताचे खंडन केले. मनीष तिवारींचे वक्तव्य वैयक्तिक असल्याची टिप्पणी पक्षाने केली आहे.

सैन्याच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे केले होते कूच
एका इंग्रजी वृत्तपत्राने ४ एप्रिल २०१२ ला याबाबत वृत्त दिले होते. त्यानुसार, १६ जानेवारी २०१२ ला सरकारला माहिती न देताच सैन्याच्या दोन तुकड्यांनी दिल्लीकडे कूच केले. त्यामुळे रायसीना हिल्समध्ये गोंधळ उडाला. हिसार ३३ वी आर्म्ड डिव्हिजन राजधानीपासून १५० किमी अंतरावर पोहोचली होती. या युनिटमध्ये ४८ लढाऊ वाहने होती. दुसरीकडे आग्रा येथून ५० पॅरा ब्रिगेडची तुकडी पालमपर्यंत पोहोचली होती. तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांचा वयावरून सरकारशी वाद सुरू होता त्या वेळी ही घटना घडली होती. मात्र, या तुकड्या नियमित सरावासाठी निघाल्या होत्या, असे लष्कर आणि सरकारने त्या वेळी स्पष्ट केले होते.

काँग्रेस प्रवक्ता पी.सी. चाको म्हणाले, काँग्रेस या वृत्ताचे खंडन करते. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, या वृत्तात तथ्य नव्हते. माझे सहकारी संरक्षण मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ समितीचे तसेच ते निर्णय घेणाऱ्या कोणत्याही संस्थेचे सदस्य नव्हते. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी म्हणाले की, मी याबाबत २०१२ मध्ये वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट केले हाेते.
तत्कालीन लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह म्हणाले, ‘तिवारींकडे सध्या काहीच काम नाही. त्यांनी माझे पुस्तक वाचायला हवे. त्यात या वादाबद्दल पूर्ण माहिती आहे.’ केंद्रीय मंत्री रविशंकर म्हणाले, त्या वेळी तिवारी यांचेच सरकार होते. त्यांनी असे मुद्दे मांडू नये.

मनमोहन, अँटनींनीच वक्तव्य द्यावे : भाजप
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले की, मनीष तिवारी यांनी मुद्दा उपस्थित करून काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची उत्तरे काँग्रेसलाच द्यावी लागतील. काँग्रेसने याआधीही राष्ट्रीय सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करून लष्कराला हतोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता काँग्रेसलाच स्पष्टीकरण द्यावे लागेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी संरक्षणमंत्री अँटनी यांच्यापेक्षा खालच्या स्तराच्या व्यक्तीचे वक्तव्य आम्हाला मंजूर नाही.

व्ही. के. सिंह यांना हटवा : जदयू
जदयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणाले की, हा मुद्दा लोकशाहीसाठी घातक आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्ही. के. सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी विनंती मी करतो. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमावी.
बातम्या आणखी आहेत...