आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohansingh Tea Party With Disappointed Mulayam Singh

अन्न सुरक्षा कायद्यावरून नाराज मुलायामसिंग यादवांबरोबर मनमोहनसिंग यांची चहा पार्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अन्न सुरक्षा अध्यादेशामुळे यूपीए समर्थकांमध्ये झालेली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानी मनमोहनसिंग आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांची सकाळी छोटेखानी टी-पार्टी झाली. सपाची नाराजी दूर करण्यासाठी अन्न सुरक्षा विधेयकात दुरुस्ती करण्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.


गुरुवारी सकाळी कॅबिनेट बैठकीच्या आधीच मुलायमसिंग पंतप्रधानांच्या सात रेसकोर्स निवासस्थानी दाखल झाले. मनमोहनसिंग आणि मुलायम यांनी सकाळच्या चहा-नाष्ट्यासोबत अन्न सुरक्षा विधेयकावर सुमारे अर्धा तास चर्चा केली. मुलायमसिंगांसोबतची बैठक आटोपून पंतप्रधान कॅबिनेटच्या बैठकीला निघून गेले. निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुलायम यांनी अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा झाल्याचे संकेत दिले. सपाच्या भूमिकेबाबत पंतप्रधानांसोबत चर्चा झाली का, असा सवाल केला असता पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अर्थातच काही ठोस प्रश्नांवरच चर्चा केली जाते, असे उत्तर मुलायम यांनी दिले. अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, असा थेट सवाल केला असता, यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर सरकारसोबत मतभेद झाले आहेत. त्यामुळे पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच गैरलागू आहे, अशा शब्दांत सपा सुप्रीमोंनी पाठिंबा काढणार नसल्याचे स्पष्ट केले.


मनधरणी कशासाठी
काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेबाबत अध्यादेश काढल्यानंतर मुलायमसिंगांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने मतपेढीवर डोळा ठेवून हा अध्यादेश काढल्याची टीका त्यांनी केली होती. त्यामुळे अन्न सुरक्षा विधेयकाबाबत संसदेत पाठिंबा मिळवण्यासाठी मुलायम यांची मनधरणी करण्यात आली.


आधी मनरेगा, आता अन्न सुरक्षा
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली होती.सत्तेवर येण्यासाठी त्याचा फायदा झाला. आताही अध्यादेश काढून काँग्रेसने तीच खेळी केल्याचे मुलायम म्हणाले होते.


महाराष्ट्रात धान्य का वाटले नाही ?
महाराष्ट्रात दुष्काळ असताना सरकारने लोकांना अन्नधान्य का वाटले नाही? पाच लाख लोक भूकबळी ठरले आहेत. त्यापैकी बहुसंख्य भूकबळी महाराष्ट्रातील आहेत.’’ -मुलायमसिंग, सपा प्रमुख


उद्याच निवडणुका होतील, असे भाजपला नेहमी वाटते
मुदतीपूर्वीच लोकसभा निवडणुका होतील, हा भाजपचा अंदाज गुरुवारी सरकारने फेटाळून लावला. निवडणूकांपासून भाजपला उद्याच निवडणूका होतील, असे नेहमीच वाटते, असा टोला माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी भाजपला लगावला. तसेच लोकसभा निवडणुका निर्धारित वेळेतच होतील, असेही स्पष्ट केले. यूपीए सरकारवर घटक पक्षांचा दबाव वाढत असल्याने काँग्रेस मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शक्यता आहे, असे भाकीत सोमवारी भाजपने वर्तवले होते. या पार्श्वभूमीवर तिवारी यांना छेडले असता ते म्हणाले, सन 2004 पासून भाजपला उद्याच निवडणुका होतील, असे वाटते. दुर्दैवाने 2004 व 2009 चा लोकसभा निवडणुकीतील जनादेश भाजपला अद्यापही पचवता आलेला नाही. अन्न सुरक्षा विधेयक व थेट अनुदान योजना राबवण्याची यूपीए सरकारची घाई पाहता राजकीय तज्ज्ञ मुदतपूर्व निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवत आहेत. मात्र, यूपीए सरकार निर्धारित कालावधी पूर्ण करेल व पुढील वर्षी 2014 मध्येच लोकसभा निवडणूक होईल, असे तिवारी म्हणाले.